पालकांनीच केली पोटच्या पोरीची अघोरी पद्धतीने हत्या, कारण ऐकून बसेल धक्का
![It was the parents who killed the baby in a horrible way, because it would shock them to hear it](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Killed-my-wife-I-am-also-committing-suicide-He-jumped-into-the-well-while-informing-his-brother-over-the-phone-1.jpg)
नागपूर | काळ्या जादूच्या संशयातून सहावर्षीय मुलीची तिच्या पालकांनीच हत्या केल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी उघडकीस आला. राणा प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुभाषनगर झोपडपट्टीत घडलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी सिद्धार्थ चिमणे (४५), त्याची पत्नी आणि मेहुणी यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली. सिद्धार्थ ‘गाव माझा’ हे यूट्युब चॅनल चालवायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीवर कोणीतरी ‘काळी जादू’ केल्याचा संशय सिद्धार्थला होता. त्यानंतर तिघांनी काही विधी करून मुलीला कथित काळ्या जादूतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी आरोपींनी काही विधी केले. त्याअंतर्गत मुलीला वारंवार बेल्टने मारण्यात आले. या अघोरी प्रकारादरम्यान मुलीला गंभीर दुखापत झाली आणि ती घरीच बेशुद्ध पडली.
आपले विधी चुकत असून मुलीची प्रकृती बिघडल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मुलीला मेयो रुग्णालयात दाखल केले. तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
दरम्यान, सिद्धार्थ आणि त्याची पत्नी रुग्णालयातून पळून गेले. ते पळून गेल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या वाहन नोंदणी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी या आरोपींची ओळख पटवली. राणा प्रतापनगर पोलिस सुभाषनगर झोपडपट्टीतील मुलीच्या घरी पोहोचले. तेथेच पोलिसांनी या प्रकरणातील तिघांना अटक केली.
भादंवि, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अॅण्ड इरेडिकेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफिस आणि इतर अमानुष, वाईट, अघोरी प्रथा, काळ्या जादू कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना आज, रविवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.