वायसीएम रुग्णालयाची राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांच्याकडून पाहणी
पिंपरी : राज्यात सरकारी हॉस्पिटलमध्ये होत असलेले मृत्यू व त्यातही नवजात बालकांचे मृत्यू याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी बुधवारी (दि. 3) पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयाला (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय) भेट देऊन तेथील बालरोग विभागाची पाहणी केली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, बालरोग विभागाच्या प्रमुख डॉ. दीपाली अंबिके उपस्थित होत्या.
बालरोग विभागातील व्हेंटिलेटर, ऑक्सिजन यंत्रणा, विविध वैद्यकीय उपकरणे, गंभीर बालकांसाठी असलेली व्यवस्था, अतिदक्षता विभाग, औषधे, लसीचा पुरवठा याचा पुरंदरे यांनी आढावा घेतला. बालरोग विभागात दाखल असलेले एकूण बालरुग्ण, गंभीर, अतिगंभीर बालरुग्ण याबाबत पुरंदरे यांनी माहिती घेतली.
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील परिस्थिती समाधानकारक आहे. पुरेसा अनुभवी कर्मचारी वर्ग, परिचारिका, डॉक्टर्स उपलब्ध आहेत. दाखल होणारी बालरुग्ण संख्या पाहता अजून एका वॉर्डची आवश्यकता आहे, असे निरिक्षण राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी नोंदविले आहे.





