“मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार, ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम” संजय शिरसाट यांचा डायरेक्ट यू-टर्न…!
!["I was with Eknath Shinde, I am and will be with him, 'They' tweet technical problem of mobile" Sanjay Shirsat's direct U-turn...!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Eknath-Shinde-1.jpg)
पुणे : “मी एकनाथ शिंदेंसोबत होतो, आहे आणि त्यांच्याच सोबत राहणार आहे. काल झालेलं ‘ते’ ट्विट मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं”, असं म्हणत संजय शिरसाट यांनी यू-टर्न घेतलाय. शिवाय उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख होते आता नाहीत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
औरंगाबाद पश्चिम महाराष्ट्राचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे शिरसाट नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच शिरसाटांनी उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख करत ट्वीट केलं आहे. यासोबत त्यांनी ठाकरेंचा विधानसभेतील भाषणाचा व्हिडिओही जोडला आहे. मात्र, काही वेळांनी त्यांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे शिरसाट आता पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परतणार की काय? अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
आम्ही आजही शिवसेनेत आहोत. जो आमचा नेता असतो तो आमचा कुटुंबप्रमुख असतो. बाळासाहेबांनंतर उद्धव साहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. उद्धव साहेब यांना नेहमीच कुटुंबप्रमुख मानत आलो आहोत. आज जरी आमचे भांडण जरी झालं असलं तरी आम्ही त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही. आम्ही दूर जरी झालो असलो तरी ते आमचे कुटुंबप्रमुख होतेच. त्यांनी घेतलेली भूमिका आम्हाला मान्य नव्हती. आमची भूमिका उद्धव ठाकरेंच्या विरोधात नसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात होती. विचार पटत नव्हते म्हणून आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ नातं तोडलेलं नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर आणि ते त्यांच्या भूमिकेवर तटस्थ राहिले”, म्हणत ट्वीट डिलीट केल्यानंतर शिरसाटांनी याबाबत प्रतिक्रिया दिली दिली होती.
मंत्रीपद मिळावे म्हणून मी हे ट्वीट केलेलं नाही. मंत्रीपदासाठी मी भुकेलेलो नाही. मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये मी प्रत्येक वेळेला माझं स्पष्ट मत मांडलं आहे. मला योग्य वाटतं ते मी बोलतो आणि बोलताना मी त्यांनी आपला विचार थोडा बदलावा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जाऊ नये, हीच भूमिका मी पहिल्यापासून मांडत आलो आहे. आजही मी त्या भूमिकेपासून मागे फिरणार नाही, मला मंत्रिपद मिळालं, नाही मिळालं हा विचार माझ्या डोक्यात कधी येत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी टीव्ही वाहिनीशी बोलताना दिले आहे.