‘मी माझ्या घरात लपलोय वाचवा… पोलिसांना चुकीची माहिती देणे पडले महागात!
!["I am hiding in my house, save me... giving wrong information to the police is expensive!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/मी-माझ्या-घरात-लपलोय-जीव-वाचवण्यासाठी-पोलिसांना-फोन-घटनास्थळ-गाठताच.jpg)
परभणी : पोलिसांना एका व्यक्तिचा मदतीचा फोन आला आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठलं. पण यानंतर असं काही दृश्य समोर आलं की पोलिसांचा राग अनावर झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ज्या व्यक्तीने फोन केला त्याला आता ही मस्ती चांगलीच महागात पडली आहे.
‘तीन व्यक्ती मला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी माझ्या घरात लपून बसलो आहे. मला मदत करा अशी चुकीची माहिती डायल ११२ क्रमांकावर पोलिसांना देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. चुकीची माहिती दिल्याचे समोर आल्यानंतर मानवत ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश पांडुरंग हरबडे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी डायल ११२ क्रमांक सुरू केला आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या क्रमांकावर संपर्क साधल्यास तातडीने मदत मिळते. मानवत ठाण्याचे पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे शनिवारी कर्तव्यावर असताना दुपारी ३,५७ वाजता तालुक्यातील रामपुरी बु. येथील उमेश पांडुरंग हरबडे याने ११२ क्रमांकावर फोन केला. यामध्ये त्याने तीन व्यक्ती मला जीवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी माझ्या घरात लपून बसलो आहे. मला मदत करा असे सांगितले. हरबडे याने मदतीची विनंती केल्यानंतर पोलीस कर्मचारी नरेंद्र कांबळे, वाहन चालक इंगळे यांच्या मदत पथकाने तातडीने रामपुरी बु. येथे धाव घेतली.
पोलीस घरी पोहोचताच पत्नीकडून धक्कादायक माहिती…
पोलिसांनी गावातील एक व्यक्तीला घेऊन तक्रारदाराचे घर गाठून त्याच्या पत्नीची चौकशी केली असता उमेश पांडुरंग हरबड़े ते माझे पती असून ते आताच जेवण करून बाहेर गेले आहेत. आमच्या घरी अशी कोणतीच घटना घडली नाही, असे सांगितले. गावात गेल्यानंतर उमेश हरबडे यांनी ज्या मोबाईल क्रमांकावरुन ११२ क्रमांकावर फोन केला होता तो मोबाईलही बंद होता. ११२ क्रमांकावर फोन करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी नरेंद्र कांबळे यांच्या तक्रारीवरून उमेश पांडुरंग हरबडे याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.