Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबई- गोवा महामार्गाचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय?; नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून आली दिलासादायक माहिती

मुंबईः मुंबई-गोवा महार्गावरील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याचे ४८ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच हा महामार्ग डिसेंबर, २०२३पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती या महामार्गाची दुर्दशा मांडणाऱ्या ‘मटा’मधील ‘महामार्गाचा वनवास’ या मालिकेनंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गाला मंजुरी देऊन १२ वर्षे उलटली तरी हा महामार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. इतकेच नव्हे तर काही भागांत महामार्गाची दुर्दशाही झाली आहे. या महामार्गाने अनेक बळीही घेतले आहेत. या सर्वांचे वास्तव मांडणारी वृत्तमालिका मटामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. याची दखल घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून या महामार्गाच्या कामाची माहिती देण्यात आली. या कार्यालातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार पळस्पे ते इंदापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू आहे. याचे ४८ टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम वेळेत करण्यासाठी जलदगतीने काम सुरू आहे. या महामार्गाचे प्रत्यक्ष काम ८० टक्के भूसंपादन होऊन जमीन ताब्यात आल्यानंतर २०१७मध्ये सुरू झाले. हे काम जलदगतीने पूर्ण व्हावे या उद्देशाने तालुकानिहाय १० भाग करून आणि निविदा निश्चिती करून कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. या सर्व पॅकेजेसमधील कामे सध्या सुरू आहेत. इंदापूर ते झाराप या एकूण ३५५ किमी लांबीपैकी २४३ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्रगतीपथावर असून, डिसेंबर, २०२३पर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आल्याचेही या माहितीमध्ये सांगण्यात आले आहे.

आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या मार्गाची दुरवस्थाही ‘वृत्तमालिकेत’ मांडण्यात आली होती. याबाबत माहिती देताना स्पष्ट केले आहे की, या भागातील पॅकेज ६ व ७चे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर बैठका घेऊन बैठकीतील निर्णयानुसार मूळ ठेकेदार एमईपी कंपनीला बदली म्हणून ठेवून रोडवेज इन्फ्रा सोल्युशनमार्फत उपकंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांची पॅकेज ६करिता व हॅन इन्फ्रा यांची पॅकेज ७करिता नियुक्ती करण्यात आली असून, ही कामे प्रगतीपथावर आहेत. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे प्रलंबित भूसंपादन मोबदला रक्कम मंजूर करण्यात आली असून, वाटपाची प्रक्रिया भूमी राशी पोर्टलमार्फत सुरू असल्याचेही कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या टिपण्णीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या महामार्गासाठी आवश्यक वन विभागाची पहिल्या स्तरावरची मंजुरी प्राप्त झाली असून काम करण्याची परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button