बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार : सदाभाऊ खोत
![How can Baramati's wicket be so smart? I will ask the above Brahmadeva: Sadabhau Khot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/बारामतीचा-गडी-एवढा-हुशार-कसा-मी-वर-गेल्या-गेल्या-ब्रह्मदेवाला-विचारणार.jpg)
सांगली : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
शरद पवारांवर टीका करताना आमदार खोत म्हणाले की, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं खोत यांनी म्हटलं आहे.
‘मी पुन्हा येईन….हे वाक्य खरं करायचं आहे’
या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं. ‘मी पुन्हा येईन, हे वाक्य आपल्याला खरं करायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचं आहे. हे लोक त्यांच्या वाक्याची खिल्ली उडवतात. मात्र शेतकऱ्यांचा दुष्काळ हटवण्यासाठी, त्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणि बारा बलुतेदारांना न्याय देण्यासाठी, मी पुन्हा येईन, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं,’ अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी फडणवीसांचं समर्थन केलं आहे.