राज्यात पावसाचा जोर ओसरला, पुणे आणि सोलापूरला यलो अलर्ट
Heavy rains subsided in the state, yellow alert for Pune and Solapur
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Rain-Mumbai.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. मात्र, कालपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. त्यासोबत पालघर, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाने हजरे लावली. इतर ठिकाणी मात्र, पावसाने उघडीप दिली. हवामान विभागाने आजही राज्यात पावसाचा अंदाज दिला आहे. आज विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणीच हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मात्र, मुंबई,ठाणे आणि औरंगाबाद परिसरात पावसाचा जोर कायम आहे. मागील तीन ते चार दिवसात राज्यात जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कलीत देखील झाल्याचं पाहायला मिळाले. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
जायकवाडी पाण्याचा विसर्ग करण्यात आला कमी –
औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली. जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही आता कमी करण्यात आला आहे. त्यामुळे 1 लाख 13 हजार क्युसेकने होणारा पाण्याचा विसर्ग आता 80 हजारावर आला आहे. मात्र, असे असताना नदी काठच्या गावांना देण्यात आलेला सतर्कतेचा इशारा कायम आहे. सद्या धरणात 80 हजार 674 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे.
यलो अलर्ट म्हणजे काय? –
यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. मात्र, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.