कोल्हापुर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू: राधानगरी धरण १०० टक्के भरले; पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे
![Heavy rains in Kolhapur district for the last four days: Radhanagari dam 100 percent full; Movement of Panchganga towards danger level](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Heavy-rains-in-Kolhapur.jpg)
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली असून धरण १०० टक्के भरले असल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे आता उघडू लागले आहेत. आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास गेट क्रमांक ६ उघडले असून यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीची वाटचाल धोका पातळीकडे होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं असून खबरदारी म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. राधानगरी धरणातून सध्या ३०२८ क्युसेकचा विसर्ग सध्या नदीत सुरू आहे. काल धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून अतिवृष्टी झाल्याने धरणामध्ये पाण्याची आवक मोठया प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज पहाटे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.
पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीने काल रात्री १० च्या सुमारास आपली इशारा पातळी गाठली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी सकाळी ६ वाजता ३९ फूट ८ इंचावर गेली असून, पंचगंगा नदीची धोका पातळी ४३ फूट आहे. पंचगंगा सध्या धोका पातळीकडे वाटचाल करत असून जिल्ह्यात आतापर्यंत ७१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीने आपली इशारा पातळी गाठल्याने यंत्रणाही सतर्क झाले असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच दरवर्षी महापुराचा सर्वात जास्त फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावातील गावकऱ्यांना त्वरित सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.