महाविकास सरकार खतरे में है : शिवसेनेने कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे १३ आमदारांसह गायब
![Government is in danger: Shiv Sena Cabinet Minister Eknath Shinde disappears with 13 MLAs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/शंभूराज-देसाई-अब्दुल-सत्तारमंत्री-शिंदेंसोबत-गायब-असलेल्या-शिवसेना-आमदारांची-यादी.jpg)
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत मते फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तसंच शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गायब झाल्याने शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं स्पष्ट झालं आहे. पक्षातील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, शहाजीबापू पाटील आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेले आहेत.
नेमका कुठे आहे मुक्काम?
एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे नाराज आमदार सुरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि महाविकास आघाडी समर्थक अपक्ष आमदारांपैकी जवळपास २० मते फोडण्यात भाजपला यश आलं आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री झालेल्या बैठकीनंतर आज दुपारी १२ वाजता पुन्हा एकदा शिवसेनेकडून आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात येत आहे. मात्र हे सर्व आमदार दुपारी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे.