सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला ५ हजार भत्ता द्या : ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे
![Give allowance of 5 thousand per month to the educated unemployed: Senior leader MLA Eknath Khadse](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/सुशिक्षित-बेरोजगारांना-महिन्याला-५-हजार-भत्ता-द्या-एकनाथ-खडसे.jpg)
मुंबई : राज्यातील सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहेत. एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून पूर्वी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायच्या त्या आता होत नाहीत. तसेच राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना पूर्वी बेरोजगारी भत्ता मिळत होता. राज्य सरकारने तो भत्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना (Educated Unemployed) महिना ५ हजार रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विधान परिषदेत (Vidhan parishad) तारांकित प्रश्नाद्वारे केली.
सेवायोजन कार्यालय (एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज) जवळपास बंद झालेले आहे. रोजगाराच्या संधी आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे कौशल्य विकास विभाग किंवा अन्य विभागांमार्फत बेरोजगारांची नोंदणी करण्यासाठी काही प्रक्रिया राबवणार का? असे प्रश्न त्यांनी विचारले.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनीही काही प्रश्न मांडले. माजी कौशल्य विकास मंत्री मा. नवाब मलिक यांनी १ लाख युवकांना नोकऱ्या मिळवून देण्याचा संकल्प राबविला होता. त्याप्रमाणे कौशल विकास विभाग काही योजना राबविणार आहे का? तसेच एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये अनेक तरुण नोंदणी करतात पण त्यांना कुणीही रोजगारासाठी बोलवत नाही. ही वस्तूस्थिती आहे. शासकीय कार्यालयामध्ये ज्या जागा रिक्त आहेत, त्या जागेवर कंत्राटी कामगारांच्या ऐवजी शासकीय भरती करणार आहात का? असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी सरकारला विचारला.
तसेच खासगी कंपन्यांसाठीही काही नियम करुन एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये ज्या बेरोजगारांनी नोंदणी केली आहे, त्यांना प्राधान्याने नोकरी देणार का? शासन याबाबत काही धोरणात्मक निर्णय घेणार का? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बेरोजगारांच्या नोंदणीबाबत सकारात्मक विचार करु असे उत्तर दिले. कौशल्य विकास विभागाने पोर्टल तयार केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते. तसेच विविध उद्योग-आस्थापने देखील तिथे नोंदणी करु शकतात असे सांगत बेरोजगारी भत्त्याचा विषय मात्र माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगून त्यांनी उत्तर देणे टाळले.