तब्बल ६ दिवसांनंतर एकनाथ शिंदे माध्यमांसमोर; ५० आमदारांबाबत मोठं विधान; नेमकं काय म्हणाले…
गुवाहाटी : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर गुवाहाटीच्या हॉटेलबाहेरून माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जात आहोत. आम्ही शिवसेनेतच, शिवसेनेला पुढे घेऊन जात आहोत, यात काहीच शंका नाही. पुढील पाऊल काय असणार हे तुम्हाला कळवू अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा सस्पेंस वाढवला आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ‘आमचे प्रवक्ते दीपक केसरकर आमची भूमिका वेळोवेळ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. इतकंच नाहीतर बंडखोर आमदारांविषयी विचारलं असता इथे सगळे अगदी आनंदात आहेत. जी माहिती आहे की इतके जण आमच्या संपर्कात आहेत, कृपया शिवसेनेनं नावं सांगावी, मग स्पष्ट होईल. दिशाभूल करण्याचं काम ते करत आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नका. इथे ५० लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत आणि ते खूश आहेत. आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी इथे कोणी आलेलं नाही, हिंदुत्वाची आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन हे लोक इथे आले आहेत.’ असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.