breaking-newsTOP NewsUncategorizedपाटी-पुस्तकमहाराष्ट्रलेख

शिक्षण ही एकमार्गी चालणारी प्रक्रिया नाही-कांचन कदम-सुतार

भूमिका

। महान्यूज । सुनील आढाव।

जगप्रसिध्द विचारवंत अरिस्टॉटल म्हणत असे “ज्यांना शिक्षण देणं हा आपला हक्क वाटतो ते स्वतःला शिक्षण देण्यात रस असल्यामुळे शिकवत राहातील. त्यात मुलांच्या स्वातंत्र्याचा बळी देतील. खरं तर शिक्षण देण्याचा हक्क कोणालाही नाही, पण मुलांना मात्र शिक्षण घेण्याचा हक्क आहे”. अरिस्टॉटल यांना त्याकाळात जे वाटत होते तेच तत्व आजही शिक्षणाला लागू आहे… शिक्षण ही एकमार्गी चालणारी प्रक्रिया नाही… यामध्ये शासन, शासन निर्णय, प्रशासकीय यंत्रणा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश होतो. परंतु, या सगळ्यामध्ये शिक्षक हा जास्त जबाबदार घटक मानला जातो. कारण. ग्राऊंड लेव्हलवर तो काम करत असतो. आमच्या शालेय जीवनाकडे पाहिले तर लक्षात येते की त्यावेळी शिक्षक हे जास्त कष्ट घ्यायचे मुलांना जास्त मार्क मिळण्यासाठी…

ही गोष्ट खरी असली तरी त्यावेळी जर त्यांनी पालकांचा जास्तीत जास्त संपर्क ठेवला असता तर अजून जास्त चांगला रिझल्ट मिळाला असता. केवळ परीक्षेत मिळालेले गुणच आजपर्यंत गुणवत्ता ठरवत आहेत. हे चुकीचे आहे. परीक्षा म्हणजे काय. आठवून लिहणे. ज्याला जास्त आठवते. तोच परीक्षेत पुढे. म्हणजे पाठांतरावर जास्त भर होता या परीक्षा पद्धतीमध्ये. त्यावेळी 10वी चा रिझल्ट चांगला म्हणजे शाळेची प्रतिष्ठा चांगली. हे ठरलेलं असायचं. पूर्वी पालकांनी मूल शाळेत घालायची बाकीचे सगळे शिक्षकच करत होते. मारून हाणून. ज्याची समजण्याची क्षमता चांगली तो वर्गात पुढे. आकलन चांगले असणारी मूल नक्कीच पुढं होती. पण त्यावेळी ज्यांना काही येत नव्हते त्या मुलांनी माराच्या भीतीने किंवा मला हे झेपणार नाही म्हणून शाळा सोडून देणारी मुलेही होतीच. ही मूल कायमचीच शिक्षणापासून बाहेर फेकली गेली. म्हणजे फक्त लेखी परीक्षेत चांगले गुण मिळाले म्हणून तुम्ही गुणवत्ता मिळवली असे नाही. त्यामुळे आपल्या मनात असणारी गुणवत्तेची व्याख्या बदलायला हवी. सचिन तेंडुलकर शाळेच्या अभ्यासात हुशार नव्हता. मात्र त्याच्याकडे असणारी गुणवत्ता ही खेळाची होती. अशी गुणवत्ता प्रत्येक पालकाने आणि शिक्षकाने ओळखायला हवी. तरच आपली मुलांकडून असणारी अपेक्षा पूर्ण होईल. मुलांना शर्यतीत पळवू नका. आपल्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत त्याच्या कोणत्या गुणाकडे आपण लक्ष केंद्रित केले तर ते उद्याचे गायक, कवी, साहित्यिक, डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू, शात्रज्ञ अजून बरेच काहीतरी होतील. आम्ही म्हणतो ऑलिम्पिकमध्ये भारत कधीच पुढे नसतो. पण का नाही याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. एखाद्याचे मूल खेळात चांगले असेल तरी त्याला पालक प्रेरणा देत नाहीत. तो फक्त अभ्यासातच पुढे राहिला पाहिजे. ही अपेक्षा ठेऊन आज आपण आपल्या मुलांना फक्त आणि फक्त चांगले स्पर्धक बनवत आहोत. त्यामुळेच कित्येक प्रश्न उपस्थित होत आहेत.

शिक्षण ही काही बळजबरीने लादण्याची गोष्ट नाही.. कोणी लादले म्हणून मुले शिकत नाहीत. मी शिकवितो म्हणून मुले शिकतात असे म्हणणे म्हणजे शिक्षण प्रक्रियेचा अर्थ न कळणे आहे. माझ्यामुळे मुले शिकली असे आपले म्हणणे असेल तर जी मुले शिकली नाहीत त्याचीही जबाबदारी देखील मीच स्वीकारायला हवी. शिक्षण ही जाणीवपूर्वक शिकविण्याची अजिबात गोष्ट नाही. शिक्षणाची वाट ही सृजनशील असते. प्रत्येक बालकाच्या आत जे काही असते त्याला बाहेर काढत फुलविणे म्हणजे शिक्षण असते. त्यामुळे शिक्षणाची वाट चालण्यासाठी जमीन पाहून पेरणीची गरज आहे. कसरदार जमीनीत पीक अधिक जोमदार पिकते आणि निकस जमिणीवर पेरणी केली तर त्यावर पीक बहरदार होण्याची शक्यता नसते. त्यामुळे पीक पिकले नाही हा दोष जमिनीचा नाही तर त्यापेक्षा जमिन पाहून पीकांची निवड केली नाही हे लक्षात घ्यायला हवे. जमीन पाहून पिकाची पेरणी केली तर दोन्ही ठिकाणी पीक चांगले येण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत देखील सुक्ष्मतेने विचार करण्याची गरज आहे. शिक्षण स्वातंत्र्याच्या भावनेतून आणि विचाराधारेतून होत असते. त्यासाठी सृजनशीलतेच्या वाटा निर्माण करणे महत्वाच्या असते.

जगप्रसिध्द विचारवंत अरिस्टॉटल म्हणत असे “ज्यांना शिक्षण देणं हा आपला हक्क वाटतो ते स्वतःला शिक्षण देण्यात रस असल्यामुळे शिकवत राहातील. त्यात मुलांच्या स्वातंत्र्याचा बळी देतील. खरे तर शिक्षण देण्याचा हक्क कोणालाही नाही, पण मुलांना मात्र शिक्षण घेण्याचा हक्क आहे”. अरिस्टॉटल यांना त्याकाळात जे वाटत होते तेच तत्व आजही शिक्षणाला लागू आहे. शिक्षण देणे म्हणजे कोणावर काही तरी लादणे नसते. शिक्षण घेण्याची उर्मी प्रत्येक मुलात दडलेली असते. मग ती उर्मी शांत बसू देत नाही. ती नवनविन वाटा धुंडाळण्याची शक्ती देत जाते. आपण कोणावर काही तरी लादले तर त्यातील असलेला आनंद हरवला जातो. कोणत्याही गोष्टीची सक्ती होते तेव्हा शिकणे होण्याची शक्यता नसते. कोणत्याही स्वरूपात केलेली सक्तीचे गुणवत्तेत रूपांतर होत नाही. त्यामुळे आपण मुलांना शिकविण्यासाठी शिक्षक झालो आहोत असे म्हणणे म्हणजे शिक्षणांच्या मुलभूत धारणेला धक्का लावणे आहे. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत आपला हक्क म्हणून कोणी शिकवत असेल तर तो चूकीच्या दिशेचा प्रवास आहे. आपल्याला शिकवायला आवडते म्हणून शिकवत असाल, तर तो आंनदाचा भाग आहे, परंतु, त्यात विद्यार्थ्यांचा आंनद कोठे आहे? हा प्रश्न आहे.

शिक्षणातून आनंद मिळेल असा मार्ग निर्माण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आपल्या आंनदासाठी शिक्षक शिकवत राहिल पण ती शिकण्याची सक्ती असणार आहे. मात्र मुले आपल्या आनंदासाठी त्याचे स्वातंत्र्य गमावत आहे हे लक्षात घ्यायला हवे. परदेशात एकदा एका राष्ट्रप्रमुखांची पुतणी शिक्षक होण्यासाठी प्रयत्न करीत होती. त्यांनी शिक्षक होण्यासाठीची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्राप्त केली होती. त्यानंतरही त्या शिक्षणांसंदर्भाने प्रयोग करीत होत्या. शिक्षक होण्याच्या जाहिरातीनंतर त्यांनी अर्ज सादर केला. त्या अत्यंत हुशार म्हणून ओळखल्या जात होत्या. संपूर्ण शैक्षणिक प्रवासात गुणही चांगले मिळाले होते. त्यांच्या अर्जानंतर राष्ट्रीय निवड समितीने त्यांना मुलाखतीसाठी बोलाविले. त्यांची मुलाखत झाली आणि निवड समितीने त्यांना नाकारले. त्यांची निवड झाली नाही. खरेतर मुलाखत छान झाली होती. त्यांची निवड होण्याची अपेक्षा होती.

स्वतःच्या आनंदासाठी रममान होणारे शिक्षक केवळ स्वतःचा आनंद शोधतील आणि मुले आनंदापासून वचिंत असतील. तेव्हा शिक्षण मुलांसाठी आहे आणि त्या प्रक्रियेत त्यांना जाणून घेणे आणि त्यांच्या आनंदाच्या शोधात चालत राहाणे महत्वाचे आहे. शिक्षणाच्या केंद्रस्थानी बालक महत्वाचे आहे स्वतः नाही म्हणून आम्ही त्यांना नाकारले. हे ऐकूण अध्यक्षांना देखील आश्चर्य वाटले. जग शिक्षणाच्या संदर्भाने किती सुक्ष्म स्वरूपाचे चिंतन करते आहे हे लक्षात येईल. त्यामुळे शिक्षक निर्मितीतच प्रयोगशीलता आणि शिकविण्याऐवजी मुलांच्या आत जे दडले आहे त्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेशी नाते सांगणारे काही घडायला हवे असते. सध्या शाळा रचनावादाची प्रक्रिया करता आहेत. शिक्षक निर्मिती प्रक्रियेत वर्तनवादी विचाराचे प्रतिबिंब असेल तर शिक्षण हक्क कायदा आस्तित्वात येऊन परिवर्तन कसे घडणार? हा प्रश्न आहे. मुल समजून घेणे, मुलं कसे शिकते हे जाणणे, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घेणे याबाबतही फारसा विचार होतांना दिसत नाही. त्यामुळे अजूनही वर्गात शिकविणे होत राहाते.

मुलांच्या आत जे आहे ते बाहेर काढत पुस्तकांच्या आशयाशी जोडण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करायला हवी. मात्र आम्ही केवळ पुस्तकातील आशय पोहचविणे म्हणजे शिकविणे म्हणतो. तो पोहचवितांना खरंच मुलाशी नाते असते का ? याचा विचार करायला हवा. शिक्षण म्हणजे पुस्तकातील तत्व पटवून देण्याची प्रक्रिया नाही, तर शिकणाऱ्यांमध्ये स्वतःचे जीवन घडविण्याची क्षमता असते यावर नितांत विश्वास असणे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करणे असते. मात्र पुस्तकात काय आहे? हे सांगणे, त्यासाठी प्रयत्न करत राहाणे म्हणजे शिक्षण नाही. मुळात मुलं पुस्तकातील तत्वापर्यंत पोहचतांना त्याचा काही पूर्व अनुभव असतो. त्या प्रवासाविषयी जाणून तत्वापर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. अनेकदा विद्यार्थ्याला तत्वे जाणून घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यापेक्षा ते तत्व लादणे घडत जाते आणि त्यासाठीचा प्रवास घडविला जात नाही. त्यामुळे शिकणे घडत नाही.

आपण शिक्षणाच्या निमित्ताने डोक्यात काही कोंदत राहाण्यापेक्षा मुलांच्या गरजा आणि त्यांच्या क्षमतेचा विचार करीत त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी प्रेरित करण्याची गरज आहे. शिक्षण म्हणजे शिकविणे नाहीच तर त्यांना शिकण्यासाठी वातावरण देणे आहे. त्यासाठी संधी निर्माण करणे आहे. त्या संधी जितक्या अधिक असतील तितके शिकणे अधिक असते. शिकता शिकता जितक्या चूका अधिक होतात तितके शिकणे अधिक पक्के व दीर्घकाळ टिकणारे होते. त्यामुळे कृती करत करत मुले स्वतः शिकतात. व्यक्ती स्वतः जितकी शिकते ते शिकणेच जीवनभर टिकते आणि जे लादून शिकले जाते त्याचा केवळ मार्कांपुरता विचार असतो. परीक्षा झाली आणि वर्ष उलटले की शिकलेले देखील पुसले जाते. त्यामुळे कोणाला सक्तीने शिकविण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा शिकण्यासाठी मदत करूया. म्हणजे त्या विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट प्रकाशवाट ठरेल, त्यातून त्या वाटा प्रकाशमान होतील. शेवटी शिक्षणाबददल ज्यांनी मुलभूत चिंतन केले त्या वाटेने चालत राहिलो तरच शिक्षणाचे भले आहे. म्हणून खलील जिब्रान म्हणाले होते की माणसं दोन ठिकाणी स्वतःहून जात नाही.. त्यापैकी एक ठिकाण आहे तुरूंग आणि दुसरे ठिकाण आहे शाळा.. त्यामुळे प्रयोगशीलतेने चालत राहीले तर यातील शाळा हे ठिकाण वजा होईल आणि ते होणे म्हणजेच शिक्षणाचा प्रवास ठरेल…

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button