दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीचा मोठी कारवाई; देशभरात 40 ठिकाणी छापेमारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/ED.png)
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
दिल्लीच्या मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज (शुक्रवारी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने दिल्ली आणि तेलंगणासह देशभरात 40 ठिकाणी छापेमारी केली आहे. पंजाब, तेलंगणा, नेल्लोर, चेन्नई आणि दिल्ली एनसीआरमध्ये ही छापेमारी सुरू आहे. याशिवाय हैदराबादमध्येही 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. दिल्ली उत्पादन शुल्क विभाग धोरण प्रकरणात ईडीचे अनेक राज्यांमध्ये सुमारे 40 ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
ईडीची देशभरात 40 ठिकाणी छापेमारी
याआधी 6 सप्टेंबरलाही ईडीने देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले होते. ईडीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, लखनौ आणि गुरुग्रामसह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. भाजपने दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकारवर नवीन मद्य धोरणाद्वारे घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
दिल्लीच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने सुमारे 40 ठिकाणी छापे टाकले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने दारू माफियांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केला, दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे मोठ्याप्रमाणात महसूल बुडाल्याचा आरोप भाजपने केला आहे. जे दिल्लीचे नवीन मद्य धोरण बनवण्यात गुंतले आहेत किंवा ज्यांना नवीन उत्पादन शुल्क धोरणाचा फायदा झाला अशा लोकांच्या ठाव- ठिकाणांवर ईडी छापेमारी करत आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर मद्य व्यापाऱ्यांना 30 कोटी रुपयांची सूट दिल्याचा आरोप आहे. परवानाधारकांना त्यांच्या इच्छेनुसार मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून मद्य धोरणाचे नियम बनवले गेले आहेत.