डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी डीजेवर वाजविल्यावरून दलित कुटुंबासोबत घडला अमानुष प्रकार; यवतमाळ जिल्ह्यातील घटना
![Dr. An inhuman incident happened to a Dalit family after Babasaheb Ambedkar's songs were played on the DJ; Incidents in Yavatmal district](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Dr.-An-inhuman-incident-happened-to-a-Dalit-family-after-Babasaheb-Ambedkars-songs-were-played-on-the-DJ-Incidents-in-Yavatmal-district.jpg)
यवतमाळः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी डीजेवर वाजविल्यावरून झालेल्या वादातून काही जणांनी दलित कुटुंबाला मारहाण केली. या प्रकरणात माजी सरपंचाच्या पतीसह नऊ जणांवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपल्यावर गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी मात्र बहिष्काराचा आरोप फेटाळून लावला आहे.
पुसदजवळील कार्ला येथे २४ जुलैला ही घटना घडली. गावातील प्रकाश टाळीकुटे यांच्याकडे मुलीच्या विवाहानिमित्त हळदीचा कार्यक्रम होता. डीजेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावण्यात आली. सारेच उत्साहात असताना माजी सरपंच भागीरथा राठोड यांचे पती रमेश हे मोटारसायकलवरून आले. त्यांनी बाबासाहेबांची गाणी डीजेवर लावू नका, त्वरित बंद करा असे खडसावून सांगितले. टाळीकुटे कुटुंबातील सदस्यांनी त्याला विरोध केला असता वाद निर्माण होऊन धक्काबुकीही झाली. रमेश राठोड यांचे नातेवाइक लाठाकाठ्या घेऊन धावत आले. त्यांनी टाळीकुटे कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. काही महिलांनाही मारहाण झाल्याने गावात तणाव निर्माण झाला.
पुसद ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ कार्ला येथे धाव घेतली. रमेश राठोड, प्रमोद रमेश राठोड, गोविंद रमेश राठोड, अमोल रमेश राठोड, दयाराम सुधाकर चव्हाण, वाघू सुधाकर चव्हाण , सदानंद शिवा राठोड, देऊ राठोड व राजू राठोड यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणाची चौकशी दारव्हाचे उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर करीत आहेत. सध्या गावात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. याप्रकरणी शिलानंद कांबळे व इतर सामाजिक संघटनांनी पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांना निवेदन देऊन आरोपींविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे. आरोपींचा शोध सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
गावातील शांतता असून टाळीकुटे परिवारावर कोणताच सामाजिक बहिष्कार नसल्याचे पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार मोतीराम बोडके यांनी सांगितले.