पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात कामगारांना ‘आरटीपीसीआर’ बंधनकारक करू नका: संदीप बेलसरे
![do-not-make-rtpcr-mandatory-for-workers-in-pimpri-chinchwad-industrial-area-sandeep-belsare](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Untitled-design-3.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
आरटीपीसीआर व रॅट चाचणी मधून औद्योगिक कामगार व कर्मचारी यांना सूट मिळावी अशी मागणी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात MIDC भोसरी, चिंचवड, पिंपरी तसेच सेक्टर ७ व १०, शांतीनगर, गुळवेवस्ती, आनंदनगर, चिखली, पवारवस्ती, कुदळवाडी,सोनवणेवस्ती, शेलारवस्ती ज्योतीबानगर, तळवडे इ. औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो. वरील सर्व औद्योगिक क्षेत्रात सूक्ष्म, लघु व मध्यम आहेत. काही उद्योग हे फार्मसी, अत्यावश्यक सेवा तसेच काही शेतीशी संबधित यंत्र सामुग्री बनविणारे आहेत.
RTPCR व RAT चाचणी :- सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात चालू असलेल्या कोरोना चाचणी RTPCR व RAT केंद्रामध्ये कोरोना चाचणीचे नमुने घेतले असता त्याचा रिपोर्ट मिळण्यास साधारणपणे पाच दिवसाचा कालावधी लागतो किंवा चाचणी करण्यास गेल्यास कीट उपलब्ध नाहीत असे सांगितले जाते . औद्योगिक परिसरात जास्तीत जास्त चाचणी केंद्र चालू करावीत. तसेच RTPCR व RAT ची चाचणी करून घेण्याची मुदत वाढवावी. RTPCR व RAT ची चाचणी ही औद्योगिक परिसरातील कामगारांना विनामुल्य असावी.
कामगारांना सोयी सुविधा :-पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजक हे कोरोना काळात कामगाराची खूप काळजी घेतात, कामगारांना मास्क शिवाय कामावर घेतले जात नाही, कामावर आल्यानंतर कंपनीच्या गेटवरच त्यांची ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जाते, त्यांना हात धुण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे hand wash ठेवले जातात, तसेच त्यांना sanitizer पुरविले जाते. कामावरून घरी जाताना देखील कंपनीच्या गेटवर त्यांची ऑक्सिजन व तापमान तपासणी केली जाते. मास्क घालूनच त्यांना घरी पाठविले जाते.
कामगारांना व कर्मचाऱ्याना RTPCR व RAT ची चाचणी करून घेण्यापासून सूट :-अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि इतर आस्थापनातील कर्मचाऱ्या प्रमाणे औद्योगिक परिसरातील कामगारांना व कर्मचाऱ्याना RTPCR व RAT ची चाचणी करून घेण्यापासून सूट मिळावी.
कोविड १९ लसीकरण केंद्राची सुविधा :-औद्योगिक परिसरात चार ते पाच ठिकाणी कोविड १९ लसीकरण केंद्राची सुविधा ही पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने आरोग्य विभागातर्फे राबविल्यास औद्योगिक क्षेत्रातील सर्वच वयोगटातील कामगारांना कोविड १९ चे लसीकरण करणे सोयीचे होईल.यासाठी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना पालिकेला आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार आहे.