धनंजय महाडिकांचा डबल धमाका; विजयानंतर भाजपकडून आणखी एक मोठी जबाबदारी?
![Dhananjay Mahadik's double blast; Another big responsibility from BJP after victory?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/dhanajay-mandalik1.jpg)
कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीत बाजी मारणाऱ्या धनंजय महाडिक यांना पक्षवाढीसाठी भाजपकडून आता मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यासाठी धनंजय महाडिक यांना आणखी ताकद देण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात महाडिक यांची मंत्रिपदावरही वर्णी लागण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात गेले ३० वर्षे महाडिक गट कार्यरत आहे. या गटाच्या वतीने महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, साखर कारखाने, दूध संस्था अशा अनेक निवडणुका लढवल्या जातात. पक्ष कोणताही असो महाडिक गट म्हणूनच हा गट सक्रिय आहे. गेल्या पाच ते सहा वर्षात लोकसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्व ठिकाणी पराभव होत असल्याने या गटाची पीछेहाट सुरू होती. तरीही कोणतीही सत्ता नसतानाही जिल्ह्यात हा गट मात्र कार्यरत आहे. या गटाला ताकत मिळण्यासाठी एखाद्या मोठ्या पदाची आवश्यकता होती. ती ताकत आता खासदार पदाने मिळाली आहे.
ज्या पद्धतीने महाडिक गटाला ताकद मिळाली आहे, त्याच पद्धतीने भाजपलाही बळ मिळालं आहे. गेल्या पाच सहा वर्षात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रात चांगलेच कमळ फुलवले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चारही जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कमळ हाती धरले. अतिशय नियोजनबद्धरित्या चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची ताकद वाढवली. मात्र राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पिछेहाट सुरू झाली होती. चंद्रकांत पाटलांना संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याने आणि पुण्यातून ते विधानसभा जिंकल्याने या भागात लक्ष देण्यावर काही प्रमाणात मर्यादा येत आहेत. अशा वेळी पश्चिम महाराष्ट्रात नेटवर्क असणारा, स्वतःचं जाळ असणारा, ताकतीचा नेता पक्षाला हवा होता. धनंजय महाडिक यांच्या रूपाने हा नेता मिळाला. त्यांच्यावर या भागाची जबाबदारी देऊन या भागात कमळ फुलविण्याचे नियोजन गेले पाच-सहा महिने सुरू होते. त्यासाठी त्यांना एखाद्या पदाची ताकद कशी देता येईल याचाही पक्ष पातळीवर विचार सुरू होता. त्यातूनच राज्यसभा निवडणुकीत यांना संधी देण्यात आली. या संधीचे सोने करत महाडिक खासदार झाले. पश्चिम महाराष्ट्रात कमळाची ताकत वाढवण्यासाठी आता या भागाची जबाबदारी महाडिक यांच्यावर सोपवली जाणार आहे.
कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यात महाडिक गटाचे मोठे नेटवर्क आणि ताकत आहे. या ताकदीच्या बळावर आता भाजपचा विस्तार करण्याची जबाबदारी महाडिक यांच्यावर सोपवण्यात येणार आहे. पक्षवाढीसाठी संघटन कौशल्यासह पदाची ताकद मिळणे आवश्यक आहे. खासदार पदाबरोबरच लवकरच केंद्रीय राज्यमंत्रिपदाचीही त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोघांचेही महाडिक यांच्यावर अधिक प्रेम आहे. कोल्हापूर, सांगली सातारा आणि सोलापूर भागात सध्या संघटन कौशल्य असणारा आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करणारा दुसरा नेता पक्षाकडे नाही. उदयनराजे पक्षाचे खासदार आहेत, मात्र पक्षविस्ताराबाबत ते फारसे सक्रिय नसतात. सांगलीचे खासदार संजय काका पाटील आणि भाजप यांच्यात अंतर्गत वाद आहे. त्यांची राष्ट्रवादी पक्षाची जवळीकता अधिक आहे. सोलापुरात विजयसिंह मोहिते पाटील हे पक्षवाढीसाठी फारसे उपयोगी पडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे.
काँग्रेस नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना तोडीस तोड म्हणून महाडिक उभे राहू शकतो. या दोघांच्या विरोधकांना एकत्र आणून नवा भक्कम गट ते तयार करू शकतात. हीच परिस्थिती सांगली आणि सोलापुरातही त्यांच्याकडून निर्माण केली जाऊ शकते. या सगळ्याला फक्त मंत्रिपदाची ताकद मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महाडिक यांना मंत्री पद दिले जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपने गेल्या पाच सहा महिन्यात त्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या, महाडिक यांना खासदार करून पहिला शब्द पाळला आहे. लोकसभेत पाच वर्षे खासदार असताना त्यांनी उत्कृष्ट काम करून तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवला. आता राज्यसभेत आपल्या कामाचा प्रभाव पाडण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मंत्रिपद देऊन त्यांना आणखी ताकद भाजप देण्याची शक्यता आहे.