शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![Decision to make Maharashtra suicide free - Chief Minister Eknath Shinde](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Decision-to-make-Maharashtra-suicide-free-Chief-Minister-Eknath-Shinde.jpg)
मुंबई | शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा निश्चय राज्य सरकारने केला असून राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
राज्य शासन सर्वांना बरोबर घेवून सर्वधर्मीयांना समन्यायाने वागणूक देणार असून सर्वांच्या विकासासाठी हे शासन काम करेल. राज्यातील सर्व प्रलंबित प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचा सच्चा सैनिक म्हणून मी काम करणार आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तत्काळ निर्णय घेवून सर्वसामान्यांची कामे लवकर होण्यासाठी आमचे सरकार भर देणार असून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहोत.