Mumbai Breaking : दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर रुग्णालयात दाखल
-
दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या छातीत दुखतंय, रुग्णालयात दाखल
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला छातीत दुखत असल्यानं मुंबईतील सरकारी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रविवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. शनिवारी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कासकरला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर हृदयविकार विभागात उपचार सुरू आहेत, अशीही माहिती आहे.
कासकरला या वर्षी फेब्रुवारीमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. ईडीने कासकरला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले होतं. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. इक्बाल कासकरवर अनेक आरोप असून त्यावर खटलेही सुरू आहेत. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळच्या साथीदारांविरुद्ध राष्ट्रीय गुंतवणूक संस्थेने (एनआयए) एफआयआर दाखल केला होता. काही महिन्यांपूर्वी ईडीने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या परिचितांवर छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित छापे मनी लाँड्रिंग प्रकरणात पडले, ज्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या इतर अनेक नातेवाईक आणि जवळच्या मित्रांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.