राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन; घरासमोर कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी
![Congress demonstration in support of Rahul Gandhi; Posters of activists in front of the house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Congress-demonstration-in-support-of-Rahul-Gandhi-Posters-of-activists-in-front-of-the-house.jpg)
नवी दिल्ली: नॅशनल हेरल्ड प्रकरणी आज, सोमवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘ईडी’ कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून काँग्रेसने जोरदार शक्तीप्रदर्शनाची योजना बनवली होती. आज काँग्रेस कार्यकर्ते भव्य रॅली काढणार होते. मात्र, पोलिसांनी काँग्रेसच्या रॅलीला परवानगी देण्यास नकार दिला आहे.दिल्ली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था आणि कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत कार्यकर्त्यांना मोर्चा काढण्यापासून रोखले आहे. पोलिसांनी जरी मोर्च्याला परवानगी नाकारली असली तरी देखील काँग्रेस कार्यरते रॅलीबाबत ठाम आहेत. काँग्रेसचे सर्व बडे नेते दिल्लीत मोर्चा ईडीच्या मुख्यालयावर काढणार आहेत. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचाही समावेश आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी आज १०. ३० वाजता राहुल गांधी ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. त्याआधीच काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
राहुल गांधींच्या घराबाहेर पोस्टर
रविवारी रात्री राहुल गांधी यांच्या दिल्लीतील घराबाहेर त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली होतीय सत्य झुकेगा नही आणि राहुल जी संघर्ष करो, हम आपके साथ है, अशा आशयाची ही पोस्टर्स ठिकठिकाणी लावली होती.
‘समन्स बिनबुडाचे’
मनी लॉडरिंगप्रकरणी राहुल गांधी यांना बजावण्यात आलेले समन्स पूर्णपणे निराधार आहे, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. राहुल गांधी लवकरच ईडीसमोर हजर होणार आहेत. ईडी भाजपच्या सदस्य किंवा ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे तिथे पोहोचत नाही, अशी टीकाही चिदंबरम यांनी केली आहे. आगामी राष्ट्रपती निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.