नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा; आयुक्त राजेश पाटील यांचे आदेश
![Complete the work of non-cleansing on the battlefield; Order of Commissioner Rajesh Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/नालेसफाईचे-काम-युद्धपातळीवर-पूर्ण-करा-आयुक्त-राजेश-पाटील-यांचे-आदेश.jpg)
पिंपरी: पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा ठरेल अशी कोणतीही कृती केल्यास आपत्ती उद्भवू शकते. त्यामुळे नदी नाल्यांचे व्यवस्थित संरक्षण करून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवला पाहिजे असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगीतले. तसेच नाले साफसफाईचे उर्वरीत काम युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी या बैठकीत उपस्थित अधिका-यांना दिले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नाले सफाईविषयी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के. अनिल रॉय, शहर अभियंता राजन पाटील, मुख्यलेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त आशादेवी दुरगुडे, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवने, अशोक भालकर, रामदास तांबे, संदेश चव्हाण, संजय खाबडे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, संदीप खोत, विठ्ठल जोशी आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडतात. तेंव्हा नागरिक महापालिकेला दोष देतात. त्यामुळे वेळोवेळी या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे. स्टॉर्म वॉटर वाहिन्यांचे चोकअप काढले पाहिजे, पाणी वाहून जाण्याची छिद्रे अथवा पाईप काही कारणास्तव बुजले गेल्यास तेथे पाणी तुंबते. त्यामुळे सातत्याने पाहणी करून कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. शिवाय वेळोवेळी नाले सफाई होणे आवश्यक आहे. प्रत्येक नाल्यासंदर्भात वेगळ्या समस्या असतात, त्यांचा अभ्यास करून सफाईच्या कामाचे योग्य नियोजन केले पाहिजे. या सफाईच्या कामासाठी पालिकेच्या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे. या कामासाठी आवश्यक जेसीबी, पोकलेन, डंपर आदी मशिनरी संबंधित विभागाने वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश आयुक्त पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिले.
दरम्यान, आयुक्त पाटील यांनी सर्व क्षेत्रीय अधिका-यांसमवेत बैठक घेऊन नालेसफाईच्या कामकाजाचा आढावा घेतला. नालेसफाईचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती यावेळी क्षेत्रीय अधिका-यांनी दिली. उर्वरीत काम युद्धपातळीवर काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त पाटील यांनी या बैठकीत उपस्थित अधिका-यांना दिले. या बैठकीस आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.के. अनिल रॉय, सहशहर अभियंता रामदास तांबे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, सीताराम बहुरे, विजयकुमार थोरात यांच्यासह विविध विभागांचे कार्यकारी अभियंते, सर्व सहाय्यक आरोग्याधिकारी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.