बनावट प्रमाणपत्र सादर करून एका महिलेने मुंबई महापालिकेत लिपिक पदाची नोकरी मिळवली, १३ वर्ष नोकरी केली, पण…
![By submitting fake certificate, a woman got a job as a clerk in Mumbai Municipal Corporation, worked for 13 years, but ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/By-submitting-fake-certificate-a-woman-got-a-job-as-a-clerk-in-Mumbai-Municipal-Corporation-worked-for-13-years-but-....jpg)
मुंबईः जातीचा बोगस दाखला आणि पडताळणी समितीचे बनावट प्रमाणपत्र सादर करून एका महिलेने मुंबई महापालिकेत लिपिक पदाची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित असलेल्या जागेवर ही महिला गेली १३ वर्षे काम करीत आहेत. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी खोटे प्रमाणपत्र सादर करून पालिकेची फसवणूक करणाऱ्या या लिपिक महिलेविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतर्फे २००८मध्ये लिपिकपदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. आरक्षण असलेल्या जागेवर अर्ज करताना जातीचा दाखला आणि पडताळणी केलेले समितीचे प्रमाणपत्र सादर करण्याची अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार डोंबिवली येथील प्रिया बाविस्कर या महिलेने अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज केला होता. हा अर्ज करतानाच तिने सोबत टोकरे कोळी जातीचा दाखला आणि प्रमाणपत्र सादर केले. मुंबई महापालिकेच्या वतीने हे प्रमाणपत्र नंदुरबार जिल्ह्यातील जात पडताळणी समितीकडे पाठविण्यात आले. प्रिया बाविस्कर यांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्यात आल्यामुळे प्रमाणपत्र पडताळणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे समितीकडून पालिकेला कळविण्यात आले.
अनुसूचित जाती आणि जमातीसाठी आरक्षित असलेली लिपिक पदाची जागा बळकाविल्याप्रकरणी प्रिया बाविस्कर यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता. त्यांच्याकडून मिळालेले उत्तर आणि पडताळणी समितीकडून आलेला अभिप्राय यामध्ये विसंगती आढळली. यावरून त्यांनी सादर केलेला दाखल बोगस असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेच्या वतीने त्यांच्याविरूद्ध आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. या तक्रारीची शहानिशा करून आझाद मैदान पोलिसांनी फसवणूक तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग अधिनियम २००० अन्वये प्रिया बाविस्कर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.