Bus Accident : एसटी अपघातातील १३ पैकी ८ मृतांची ओळख पटली, महाराष्ट्रातील ५ जणांचा समावेश
![Bus Accident: 8 out of 13 dead in ST accident have been identified, including 5 from Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Bus-Accident-एसटी-अपघातातील-१३-पैकी-८-मृतांची-ओळख.jpg)
जळगाव : मध्य प्रदेशातील इंदौर येथे एसटी बस नर्मदा नदीत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर डेपोची बस मध्य प्रदेशातील खलघाट आणि ठिगरी येथील नर्मदा नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत एसटीच्या चालक आणि वाहकासह एकूण १३ जणांनी आपला जीव गमावला आहे. तसंच मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंदोर-अमळनेर ही बस (एम.एच.४० ओ एन.९८४८) आज सोमवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास इंदौर येथून अमळनेरकडे येण्यासाठी निघाली. चालक चंद्रकांत पाटील आणि वाहक प्रकाश श्रावण चौधरी हे बस घेऊन येत होते. मात्र खलघाट आणि ठिगरी येथील पुलावर आल्यानंतर बसचा टायर फुटला आणि बस थेट नर्मदा नदीच्या पात्रात कोसळली.
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी धाव घेतली. तसंच इंदौर व धार येथून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या जवानांना घटनास्थळी तात्काळ पाठवण्यात आले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांनी प्रशासनाला बचावकार्याचे आदेश दिले. त्यानंतर नदीपात्रातून आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून यातील आठ जणांची ओळख पटली आहे.
मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच जणांचा समावेश
बस दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चार जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे. चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (वय ४५, राहणार अमळनेर , जळगाव), वाहक प्रकाश श्रावण चौधरी (वय ४०, रा. शारदा कॉलनी, अमळनेर जळगाव), निंबाजी आनंदा पाटील (वय ६०, रा. पिळोदा ता. अमळनेर) आणि कमला निंबाजी पाटील (वय ५५, रा पिलोदा ता. अमळनेर) अशी जळगाव जिल्ह्यातील चारही मृतांची नावे आहेत. तर मूर्तिजापूर, अकोला येथील अरवा मुर्तजा बोरा (वय २७) यांनीही या दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या अपघातासंदर्भात एक नियंत्रण कक्ष स्थापन केल्याची माहिती जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. या नियंत्रण कक्षाचा क्रमांक ०२५७२२२३१८० आणि ०२५७२२१७१९३ असा आहे.