महाविकासआघाडीत बिघाडी?; मंत्रिमंडळातील मंत्री गृहमंत्री वळसे-पाटलांवर नाराज
![Big development breakdown ?; Cabinet Minister displeased with Home Minister Valse-Patal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/valase-patil.jpg)
प्रतिनिधी, मुंबईः राज्य मंत्रीमंडळातील वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमात तलवार दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पडसाद गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. या प्रकरणात महाआघाडीतील तिन्ही पक्षांतील मंत्र्यांनी गृहमंत्र्यांविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर गुन्हा कसा दाखल होऊ शकतो, असा सवाल करून मंत्र्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस नेते इम्रान प्रतापगढी यांनी तलवारी उंचावून दाखविल्या. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन केल्याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात शेख, गायकवाड आणि प्रतापगढी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे मोहित कंबोज यांनी हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. महाविकास आघाडी सरकारमधील या दोन्ही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याने गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद पेटला असून, त्याचे पडसाद गुरुवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्या काही मंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली. राज्य सरकार आपलेच असतानाच मंत्र्यांवर गुन्हा दाखल केल्याने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली.
मुख्य सचिवांची समिती
दोन मंत्र्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतल्याचे कळते. पोलिसांनी कोणत्या आधारे हा गुन्हा दाखल केला आहे, याची माहिती घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, या समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.