तरुणीने रात्री आत्महत्या करताच दुसऱ्या दिवशीच चुलत भावानेही संपवलं जीवन; गावात खळबळ
![As soon as the young woman committed suicide at night, her cousin died the next day; Excitement in the village](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/As-soon-as-the-young-woman-committed-suicide-at-night-her-cousin-died-the-next-day-Excitement-in-the-village.jpg)
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे चुलत भाऊ बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐश्वर्या पंडित (१८) आणि आनंदा पंडित (२८ ) अशी मृत बहीण-भावाची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोन्ही मृतदेहांवर डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी सकाळी उत्तरीय तपासणी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे ऐश्वर्या पंडित व तिचा चुलत भाऊ आनंदा पंडित हे एकाच गल्लीमध्ये राहतात. सोमवारी सायंकाळी ६ वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून ऐश्वर्या हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग, राजेश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला.
दरम्यान, आज पहाटे आनंदा पंडित या तरुणानेही डोंगरकडा शिवारामध्ये एका शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी डोंगरकडा शहरात जाऊन आनंदा याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथे आणला आहे. मृत आनंदा पंडित व ऐश्वर्या पंडित हे दोघेजण चुलत भाऊ बहीण आहेत.
दरम्यान, या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी कुठल्या प्रकारची नोंद आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अद्यापपर्यंत झालेली नाही.