दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे अंत्रोळी येथे घरगुती भांडणाच्या रागातून एका वृद्ध व्यक्तीचा खून
![An elderly man was killed in a domestic dispute at Mauje Antroli in South Solapur taluk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/An-elderly-man-was-killed-in-a-domestic-dispute-at-Mauje-Antroli-in-South-Solapur-taluk.jpg)
सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे अंत्रोळी येथे घरगुती भांडणाच्या रागातून एका वृद्ध व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मंद्रुप पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. वृद्ध व्यक्तीच्या मेहुण्यास आणि मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
शिवाजी थोरात (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत व्यक्तीने आपल्या पत्नीला कुऱ्हाडीने मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून मेहुणा भीमराव रामचंद्र जाधव (वय ४२), मुलगा तानाजी शिवाजी थोरात (वय २८) यांनी शिवाजी थोरात यांना १३ ऑगस्ट रोजी झाडाला बांधून बेदम मारहाण केली. लाकडी वाशाने शिवाजी थोरात यांच्या शरीरावर जबरदस्त प्रहार केले. यामध्ये मृताच्या बरगड्या तुटल्या होत्या. या मारहाणीत शिवाजी थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्याचा बनाव
मुलगा तानाजी थोरात याने मंद्रुप पोलीस ठाण्यात वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती दिली. स्टॅण्ड तुटल्याने मोटारसायकल वरून पडले अशी माहिती तानाजी थोरात याने १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलिसांना दिली. पण, पोलिसांना संशय बळावल्याने त्यांनी कसून तपास केला. आजूबाजूच्या नागरिकांकडून माहिती घेतली. मोटारसायकलचे निरीक्षण केले. त्यावरून लक्षात आले की, गाडीचं स्टॅण्ड खूप दिवसांपूर्वी तुटले आहे. आजूबाजूच्या नागरिकांत सुरू असलेली कुरबुर पोलिसांच्या कानावर आली. त्यांनी ताबडतोब तानाजीला अटक केले आणि मृत व्यक्तीच्या पत्नीसही चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी खरी माहिती समोर आली.
नारळाच्या झाडाला बांधून वडिलांना मारहाण
मृत शिवाजी थोरात हे आपल्या पत्नीपासून विभक्त राहत होते.पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. १२ ऑगस्ट रोजी शिवाजी थोरात घरी आले आणि कौटुंबिक वादातून पत्नीला मारहाण करू लागले. वाद विकोपास जाऊन शिवाजी थोरात यांनी पत्नीच्या पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातला. जखमी आईला मुलगा तानाजीने रुग्णालयात उपचार करून वडिलांना शोधून आणले आणि नारळाच्या झाडाला बांधून मामा भीमराव जाधव याला कंदलगाव वरून बोलावून घेतले.
लाकडी वाशाने मारून मारुन बरगड्या तोडल्या
तानाजी थोरात आणि भीमराव जाधव यांनी १३ ऑगस्ट रोजी दुपारी शिवाजी थोरात यांना लाकडी वाशाने जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी थोरात यांच्या सर्वांगास मार लागला. तसेच, शरीरातील बरगड्या तुटल्या. पोलिसांनी कसून तपास केल्यावर ही सर्व माहिती समोर आली. पीएसआय करपे यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोघा मामा भाच्याला अटक केली आहे. १८ ऑगस्टपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यामध्ये नेत्र साक्षीदार आईचा देखील जबाब घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी दिली आहे.