आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर?
![Amit Shah to tour Maharashtra on the backdrop of upcoming elections?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/निवडणुकांच्या-पार्श्वभूमीवर-अमित-शहा-महाराष्ट्र-दौऱ्यावर-भाजपचे-नियोजन-सुरू.jpg)
पुणे : भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर औरंगाबादेत होणार आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपने मराठवाड्याच्या राजधानीत २८ व २९ मे रोजी बैठकीचे आयोजन केले होते. सांगतेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित केले होते. या दरम्यान शहा यांना येणे शक्य नसल्याने कार्यकारिणी बैठक पंधरा दिवस पुढे ढकलली जाणार असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
औरंगाबादेत भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक २००५-०६ मध्ये झाली होती. त्या वेळी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा झाली होती. त्यानंतर एकदा राज्य कार्यकारिणीची बैठक झाली. त्याला पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद आणि मराठवाड्यात भाजपची ताकद दाखविण्यासाठी २३ मे रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाणीप्रश्नी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर २८ व २९ रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीच्या सांगतेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रित केले आहे. शहा यांची जाहीर सभा घेण्याचेही नियोजन सुरू असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात बैठक
अमित शहा यांना नियोजित तारखांमध्ये येणे शक्य नसल्याने कार्यकारिणी बैठक पुढे ढकलण्यात येणार असून, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात ही बैठक औरंगाबादेत होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. निवडणुकांसाठी लगबग सुरू होताच सर्वच राजकीय पक्षांनी औरंगाबादवर लक्ष्य केंद्रित केले आहे.