अजित पवारांना मोदींच्या कार्यक्रमात भाषणापासून रोखलं, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘हा तर अपमान’
![Ajit Pawar barred from speaking in Modi's program, Supriya Sule says, 'This is an insult'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Ajit-Pawar-barred-from-speaking-in-Modis-program-Supriya-Sule-says-This-is-an-insult.png)
अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे-मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांचा देहूत एक कार्यक्रम पार पडला. देहूत संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. मात्र, या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणापासून वंचित ठेवण्यात आलं. या कार्यक्रमात अजित दादांचं भाषणच झालं नाही. त्यावरुन आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
त्या अमरावतीत बोलत होत्या. अमरावती येथे सुप्रिया सुळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. एकच वादा अजित दादा, महाराष्ट्राचा आवाज दाबणाऱ्या या मोदी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.
हा महाविकास आघाडीवर अन्याय – सुप्रिया सुळे
“मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये प्रोटोकॉलसाठी अजित पवारांचं भाषण व्हावं म्हणून महाराष्ट्र सरकारने पीएमओला विनंती केली होती. पण, ती विनंती त्यांनी ग्राह्य धरली नाही. हा महाविकास आघाडीवर अन्याय आहे. आमच्या राज्यातील आमचा नेता व्यासपीठावर आहे. तुम्ही विरोधीपक्षाच्या नेत्यांना भाषण करु देता पण आमच्या नेत्याला भाषण करु देत नाही. ही दडपशाही आहे. आमच्या नेत्याचा आवाज दाबण्याचं काम केलेलं आहे. दुर्दैव आहे. प्रोटोकॉलप्रमाणे आमच्या नेत्याला भाषण करण्याची संधी द्यायला हवी होती”, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
फडणवीसांचं भाषण झालं पण अजितदादांचं नाही
या कार्यक्रमात भाजपचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि अजित पवार उपस्थित होते. देवेंद्र फडणवीसांच्या भाषणानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं. त्यानंतर मोदींनी अजितदादांकडे हात करत त्यांना बोलू द्या म्हटलं. पण, कार्यक्रमाच्या प्रोटोकॉलमध्ये अजित पवारांचं भाषण होतं की नाही हा खरा प्रश्न आहे. अजित पवारांना का बोलू दिलं गेलं नाही याचं उत्तर आता देहू संस्थानला द्यावं लागणार आहे.