कृषि वार्ता : महाराष्ट्राचे काळे सोने पंढरपुरी म्हैशीकडे दुर्लक्ष नको!
जगात भारी म्हैस पंढरपुरी : डॉ. व्यंकटराव घोरपडे, सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-28-1-780x470.jpg)
सांगली : म्हैस हा तसा अति प्राचीन प्राणी आहे. साधारण इसवी सन पूर्व २५०० ते ३००० वर्षांपूर्वी भारतामध्ये त्याचे अस्तित्व आढळून आले आहे. दिल्ली स्थित असलेल्या एका पुरातत्त्व विभागाच्या वस्तुसंग्रहालयातील एका स्मृती चिन्हावर म्हशीचे चित्र आढळून येते. तसेच मध्य प्रदेशातील सांची येथील असलेल्या जगप्रसिद्ध स्तूपाच्या एका प्रवेशद्वारावर म्हशीचे सुंदर असे शिल्प आढळून येते. अलीकडे इराण येथील उत्खननात सापडलेल्या अकॉडियन राज घराण्याच्या मुद्रेवर नदीवर दोन म्हशींना पाणी पाजत असल्याचे चित्र आढळले आहे. म्हणजेच अनाधिकालापासून या म्हशी मानवाने माणसाळल्या आहेत आणि त्याचे संगोपन करण्यास सुरुवात केली आहे. असे असताना वैदिक वांड:मयात गाईला जे स्थान मिळाले ते म्हशीला मिळाले नाही. विविध वैदिक ग्रंथात गाईचे धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व वर्णन केले आहे. मात्र म्हैशीच्या नशिबात हे भाग्य कदाचित नसावे. पुरातन काळात मात्र यमाचे वाहन रेडा, दुर्गा देवीने रेड्याच्या रूपातील महिषासुराचा वध केला तसेच कौटिल्य अर्थशास्त्रात गाईच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधापासून दीडपट तूप तयार होऊ शकते असे लिहिलेले आहे इतकाच काय तो संदर्भ आहे. त्या काळात म्हैशीचा वापर दूध उत्पादन आणि मांस उत्पादनासाठी होत होता तो आजही सुरू आहे. पंजाब मध्ये तर म्हशीला कौटुंबिक सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
मुळातच म्हशीचा विकास आणि उत्पत्ती ही आशिया खंडातीलच आहे. त्यामुळे जगातील एकूण म्हैशी पैकी ९५ टक्के पेक्षा जास्त म्हैशी आशिया खंडात आढळतात. त्यांचा एकूण दूध उत्पादनातील वाटा देखील ५५ ते ५७ % आहे. म्हशीचे वर्गीकरण करताना चिखलात लोळणाऱ्या ( Swamp Buffalo) आणि पाण्यात डुंबणाऱ्या (Water Buffalo) अशा दोन वर्गात प्रामुख्याने केले जाते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, चीन आणि मलेशिया या देशातील म्हशी या दलदलीच्या ठिकाणी चिखलात लोळणाऱ्या म्हशी म्हणून ओळखल्या जातात. आपल्या देशातील सोबत श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान,आणि बांगलादेशातील बऱ्यापैकी दूध देणाऱ्या म्हशी या पाण्यात डुंबणाऱ्या
या सदरात मोडतात. आपल्या देशात एकूण २० मान्यता प्राप्त म्हैशीच्या प्रजाती आहेत. इतर अनेक म्हशीच्या प्रजाती या स्थानिक भागात आढळतात. मान्यता प्राप्त म्हशी मधे उत्तर भारतात मुर्दाड, निलीरावी, भदावरी, पश्चिम भारतामध्ये जाफराबादी, सुरती, मेहसाणा मध्य भारतात नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, जेरांगी, कालाहंडी, संबळपुर व दक्षिण भारतामध्ये तोडा, साउथ कॅनरा, गोदावरी या प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर अनेक पशुपालक राज्यातील पूर्णाथडी, पंढरपुरी, मराठवाडी, नागपुरी यासह मु-हा, मेहसाणा, सुरती, जाफराबादी या प्रजातीचा सांभाळ करतात.
आज आपल्या राज्यातील काळ सोनं म्हणून ओळखली जाणारी पंढरपुरी म्हैस ही साधारण १५० वर्षापासून पंढरपूर भागातील गवळी समाज सांभाळत आहे. त्यांनीच या जातीचे संगोपन आणि संवर्धन केले असावे. साधारण कोरड्या हवामानास अनुकूल व जादा दूध देणारी ही स्थानिक जात आहे. १६ ते ४७ अंश सेल्सिअस तापमानात तग धरणारी आणि कमी पर्जन्यमान असलेल्या भागात होत असलेल्या ज्वारी, बाजरी, मका या पिकाच्या चाऱ्यावर ज्यादा दूध उत्पन्न देणारी ही प्रजाती आहे. त्यामुळे ही प्रजाती सोलापूरसह सांगली कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते. पंढरपुरी म्हैस आकाराने मध्यम असून चेहरा लांबट व निमुळता असतो. रंग काळा असून काही वेळा राखाडी देखील आढळतो. शिंगे लांब खांद्याच्या पलीकडे तलवारीच्या आकाराचे असतात. सरासरी लांबी १०० सेंटीमीटर पर्यंत आढळते. कानदेखील लांब असतात. १९ ते २४ सेंटिमीटर पर्यंत त्याची लांबी असते. कास पोटाला चिकटलेली, सड लंबगोलाकार असतात. कास देखील फिकट काळसर रंगाची असते व ठेवन देखील उत्तम असते. प्रौढ म्हशीचे वजन ३८० ते ४०० किलो पर्यंत असते व रेडे देखील ४५० ते ५०० किलो पर्यंत वजनाचे असतात. रेड्या ३० ते ३५ महिन्यात माजाला येऊन ४३ ते ४६ महिन्यात व्येतात तसेच ३ ते ३.५ महिन्यात पुन्हा गाभण जातात हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे. सदर पंढरपूर ही म्हशीला एकूणच राज्याच्या हवामानाचा विचार केला तर निश्चितपणे संपूर्ण राज्यात किंबहुना नजीकच्या राज्यात देखील फार चांगला मोठा वाव आहे.
या प्रजातीच्या संवर्धनासाठी व अनुवंशिक सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्या अर्थसाहयातून २०१४ पासून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड आनंद यांच्या सहयोगाने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे पंढरपूर सह माढा, सांगोला, माळशिरस, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर या नऊ तालुक्यात ‘वंशावळ निवडीतून उच्च अनुवंशिक गुणवत्ता असलेल्या पंढरपुरी जातीचे वळू तयार करणे’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या सर्व तालुक्यातून एकूण ४० कृत्रिमरेतन सेवा देणाऱ्या केंद्राच्या माध्यमातून ऑगस्ट २४ अखेर ६०१२५ कृत्रिम रेतन करण्यात आली आहेत. सदर प्रकल्पाचा २९९७५ पशुपालकांनी लाभ घेतला आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून आज अखेर ७४९२ मादी वासरे जन्माला आली आहेत. कार्यक्षेत्रातील ७०४४ पंढरपुरी म्हशीचे दूध मोजणी देखील करण्यात आली आहे. दूध उत्पादनाच्या बाबतीत पूर्वी १३०० ते १६०० किलो प्रति वेत असणारे दूध उत्पादन हे आज २००० किलोपर्यंत प्रतिवेत गेल्याचे या प्रकल्पातील दूध मोजणीत आढळले आहे. सोबत या पंढरपुरी म्हशीचे फॅट हे ८ टक्के असते त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील एक लिटर दुधामध्ये ६ ग्रॅम पर्यंत आढळले आहे. या प्रकल्पातील सर्व पशुपालक हे आपल्या गोठ्यातच चांगल्या रेड्या देखील तयार करून दूध उत्पादन वाढवत आहेत. या प्रकल्पातून आज अखेर पशुपालकांच्या गोठ्यात तयार झालेले उच्च वंशावळीचे ३५ वळू हे पशुसंवर्धन विभागाच्या पुणे व औरंगाबाद येथील गोठीत रेतमात्रा प्रयोगशाळेत, राहुरी सिमेन स्टेशन, बायफ पुणे, साबरमती आश्रम गोशाळा गुजरात, अलमंडी सिमेन स्टेशन चेन्नई या ठिकाणी वीर्य उत्पादनासाठी पुरवण्यात आले आहेत. त्यातून उत्पादित रेतमात्राचा महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक भागात पुरवठा करण्यात येत आहे. सोबत सोलापूर, जालना, कोल्हापूर, पुणे येथील अनेक प्रगतिशील पशुपालकांना १६ रेडे नैसर्गिक रेतनासाठी पुरवण्यात आले आहेत. जेणेकरून या माध्यमातून उच्च अनुवंशिक गुणवत्ता असलेली पैदास निर्माण होऊन पशुपालकांना फायदा होईल.
पंढरपुरी म्हशीच्या इतर वैशिष्ट्ये म्हणजे कमी व निकृष्ट चाऱ्यावर चांगले दूध देतात. निकृष्ट वाळलेल्या वैरणीवर देखील दूध उत्पादनामध्ये खंड पडत नाही. दूध काढण्याच्या सवयी बाबत फार काटेकोर नाहीत. त्यासाठीच कोल्हापूर शहरात दूध कट्ट्यावर त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घरातील कोणीही दूध काढू शकते. काटक व रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने आजारी पडत नाहीत व पडल्यास तात्काळ उपचाराने बरे होतात. भाकड काळ देखील कमी आहे व कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून गर्भधारणेचे प्रमाण देखील खूप चांगले आहे. उत्तम व्यवस्थापन ठेवल्यास दिवसाला १२ ते १५ लिटर दूध देण्याची क्षमता देखील आहे. तर अशा पद्धतीने राज्यातील आपली म्हैस पशुपालकांनी जाणीवपूर्वक सांभाळायला हवी. उठ सुट परराज्यात जाऊन तेथील मु-हा, मेहसाणा, सुरती म्हैशी आणण्यापेक्षा आपल्या वातावरणातील चांगल्या दुध देणाऱ्या पंढरपुरी म्हैशी जर आपण सांभाळल्या तर निश्चितपणे त्यांची संख्या वाढून एकूणच पशुपालकाच्या जीवनात अमुलाग्रह बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आज पर्यंत आपल्या राज्यातील काही प्रमाणात माडग्याळ मेंढी सोडली तर इतर कोणतेही ब्रीड आपण देश पातळीवर घेऊन जाऊ शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. यासाठीच गरज आहे ती पंढरपुरी म्हशीच्या प्रसिद्धी आणि प्रचाराची. त्यासाठी राज्यातील सर्व संबंधित पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, विद्यापीठ आणि सेवाभावी संस्था यांनी याबाबत पशुपालकांच्या मध्ये जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.
सदर प्रकल्पामुळे पंढरपुरी म्हैशीत अनुवंशिक सुधारणे सह दूध उत्पादन मोजल्यामुळे त्यांची खरी दूध उत्पादन क्षमता समजू शकली. पंढरपुरी जातीची संख्या देखील कार्यक्षेत्रामध्ये वाढत आहे. प्रकल्पामुळे उच्च वंशावळीचे वळू देखील इतर संस्थांना व राज्यांना आम्ही पुरवठा करू शकलो. येणाऱ्या काळात पंढरपुरी म्हशीची विशेष ओळख (ब्रँड) तयार करून आपल्या राज्यासह इतर राज्यांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
– डॉ. राजकुमार वसुलकर, प्रकल्प समन्वयक, पंढरपुरी म्हैस वंशावळ सुधारणा प्रकल्प पंढरपूर.