विनेश फोगाट आहे कोट्यवधींची मालकीण; एकूण संपत्ती किती?

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटने काँग्रेसमध्ये प्रवेश करत हरियाणा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने तिला जुलाना विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केले असून तिने या मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विनेश फोगटने आपली संपत्ती, कर्ज याबद्दल माहिती दिली आहे.
विनेश फोगटने आपल्या प्रतिज्ञापत्रात तीन चारचाकी वाहने असल्याचे नमूद केले आहे. तसेच एका वाहनासाठी कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचेही सांगितले आहे. विनेशकडे ३५ लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी ६०, १२ लाखांची ह्युडांइ क्रेटा आणि १७ लाखांची टोयोटा इनोव्हा अशा तीन गाड्या आहेत. इनोव्हा गाडी घेताना १३ लाखांचे कर्ज काढले असून ते अद्याप भरायचे असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा – ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या शुभमुहूर्त
विनेश फोगटचा पती सोमवीर राठीकडे १९ लाखांची महिंद्रा स्कॉर्पियो गाडी आहे. स्थावर मालमत्तेमध्ये विनेशकडे सोनीपत याठिकाणी दोन कोटी रुपयांचा एक प्लॉट आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात म्हटल्याप्रमाणे मागच्या आर्थिक वर्षात विनेश फोगटचे वार्षिक उत्पन्न १३ लाख ८५ हजार इतके होते. तर पती सोमवीरचे वार्षिक उत्पन्न ३ लाख ४४ हजार रुपये इतके आहे. तर जंगम मालमत्तेपैकी दागिने, गुंतवणूक, बँकेतील शिल्लक असे मिळून एकूण एक कोटी १० लाख रुपये आहेत. विनेशकडे ३५ ग्रॅम सोने असून त्याचे बाजारमूल्य २ लाख २४ हजार इतके आहे. तसेच चांदी ५० ग्रॅम असून बाजार भावानुसार त्याची किंमत साडे चार हजार रुपये एवढी होते.





