रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर मुंबईकरांना मिळाला ‘हा’ आणखी एक दिलासा
![After the number of patients came under control, Mumbaikars got another relief](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/After-the-number-of-patients-came-under-control-Mumbaikars-got-another-relief.jpg)
मुंबईः मुंबईत करोना नियंत्रणात आला असून सध्या आढळणाऱ्या रुग्णांमध्ये लक्षणे असणाऱ्याची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण २ ते ५ टक्क्यांपर्यंत आहे. एकूण सात जम्बो करोना केंद्रांमधील सुमारे १५ हजार खाटांवर फक्त एक टक्का रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे आठवडाभरात ही सर्व जम्बो करोना केंद्रे बंद करण्यासाठी पालिका कार्यवाही सुरू करणार आहे.
मुंबईत मार्च २०२० मध्ये करोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिका आणि राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे करोनाच्या तीन लाटा यशस्वीपणे परतवण्यात आल्या. यंदाच्या मे महिन्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढली होती. दैनंदिन रुग्णसंख्या अडीच हजारांपार गेलेली रुग्णसंख्या आता २०० ते २५० वर आली आहे. त्यामुळे प्रशासन जम्बो करोना केंद्रे बंद करण्याबाबत आढावा घेत आहे. तिसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर दहापैकी दहिसर, गोरगाव आणि कांजुरमार्ग येथील जम्बो केंद्रे याआधीच बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली.
जम्बो करोना केंद्रांमध्ये असलेल्या खाटा आणि वैद्यकीय साहित्य पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्याचे पालिकेचे नियोजन असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तूर्तास ही केंद्र बंद करण्यात येणार असली तरी अचानक जादा खाटांची आवश्यकता भासल्यास या खाटा लगोलग उपलब्ध होतील, अशा स्थितीत ठेवण्यात येतील, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
(तक्ता)
करोना केंद्रांची स्थिती
बंद करोना केंद्रे खाटा
दहिसर चेक नाका, कांदरपाडा ७००
नेस्को गोरेगाव टप्पा १ २,२२१
नेस्को गोरगाव टप्पा २ १,५००
कांजूरमार्ग कोविड सेंटर २,०००
(तक्ता)
लवकरच बंद होणारी केंद्रे व तेथील खाटा
केंद्र खाटा
मालाड २,२००
बीकेसी २,३२८
शीव १,५००
भायखळा १,०००
मुलुंड जम्बो सेंटर १,७०८
सेव्हन हिल्स रुग्णालय, अंधेरी १,८५०