ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील कामगाराने २२ लाखांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस
![A worker in a senior citizen's house has revealed the case of withdrawing cash of 22 lakhs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/crime-6.jpg)
ज्येष्ठ नागरिकाच्या घरातील कामगाराने २२ लाखांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील सॅलिसबरी पार्क परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी मुकेश महाराज उर्फ रामजांदू (वय २४, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
क्रारदार कर सल्लागार असून ते सॅलसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपी मुकेश महाराज त्यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता. मुकेशने तक्रारदाराचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील २२ लाखांची रोकड लांबविली. रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने चौकशी केली. घरात स्वयंपाकी म्हणून काम करणारा आरोपी मुकेश कामावर न आल्याने त्याच्यावरचा संशय बळावला. तक्रारदाराने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे तपास करत आहेत.