आपला भाऊ हे जगच सोडून गेल्याचं कळल्यानंतर धक्क्याने बहिणीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना
![A heartbreaking incident where the sister also died in shock after learning that her brother had left this world](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/A-heartbreaking-incident-where-the-sister-also-died-in-shock-after-learning-that-her-brother-had-left-this-world.jpg)
वर्धा : बहीण-भावाचं नातं हे नेहमीच आपुलकीचं आणि मायेचं मानलं जातं. एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेण्यासाठी भावंड नेहमीच तत्पर असतात. मात्र आपला भाऊ हे जगच सोडून गेल्याचं कळल्यानंतर धक्क्याने बहिणीनेही प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना वर्धा जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील सिंदी रेल्वे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. इकबाल किफायद शेख (वय ३५ वर्षे) असं मृताचं नाव आहे. तर भावाच्या निधनाचे वृत्त कळताच धक्क्याने आजारी असलेल्या बहिणीचाही मृत्यू झाला. परविन किफायद शेख (वय ४० वर्षे) असं बहिणीचं नाव आहे. या घटनेनं शहरात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बडी मशीद परिसरातील इकबाल किफायद शेख (वय ३५ वर्षे) हा नागपूर येथे मार्केटिंगचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे तो नागपूरहून आपल्या दुचाकीने सिंदी (रेल्वे) येथे येण्यासाठी निघाला. मात्र धवलपेठ पुलापूर्वी अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
इकबाल किफायद शेख याच्या अपघाती निधनाची बातमी शहरात धडकली. भावाच्या अशा अकाली मृत्यूची माहिती मिळताच आजारी बहिणीला चांगलाच धक्का बसला. याच धक्क्याने तिचाही मृत्यू झाला.
दरम्यान, सर्वसामान्य कुटुंबातील शेख परिवारात दोन भाऊ, एक बहीण आणि एक वृद्ध आई असे सदस्य होते. एकाचवेळी घरातील दोघांच्या मृत्यूने वृद्ध आई एकाकी पडली आहे.