सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या
![A 35-year-old married man commits suicide after suffering from his father-in-law](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/A-35-year-old-married-man-commits-suicide-after-suffering-from-his-father-in-law.png)
परभणी : मुलबाळ होत नाही या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन होत असलेल्या सासरच्या त्रासाला कंटाळून एका ३५ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना परभणी तालुक्यातील किन्होळा येथे घडली. या प्रकरणी सासरच्या मंडळीवर ग्रामी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जयश्री खरवडे वय ३५ वर्ष असे मयत विवाहितेचे नाव आहे.
जयश्री खरवडे यांचा विवाह भगवान खरवडे यांच्यासोबत झाला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी मुलबाळ होत नाही, या कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेत जयश्री खरवडे हिचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्याचप्रमाणे वारंवार घरातून बाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. या जाचाला आणि त्रासाला कंटाळून विवाहितेने घरातील विषारी द्रव प्राशन केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी मयताचे वडिल प्रकाश शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नवरा भगवान खरवडे, सासू सुशिला खरवडे, सासरा अच्युतराव खरवडे, दीर नितीन खरवडे, गोपाल खरवडे, जाऊ यशोदा खरवडे यांच्यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोउपनि भगवान जाधव करत असून घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण सोमवंशी, पोलीस उपनिरीक्षक भगवान जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली.