जळगाव तालुक्यातील आसोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली सुनसगाव येथील २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या
![A 22-year-old youth from Sunasgaon committed suicide under a running train near Asoda railway gate in Jalgaon taluka](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/A-22-year-old-youth-from-Sunasgaon-committed-suicide-under-a-running-train-near-Asoda-railway-gate-in-Jalgaon-taluka.jpg)
जळगाव : जळगाव तालुक्यातील आसोदा रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली सुनसगाव येथील २२ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लखन संजय सोनवणे (वय-२२, रा. सुनसगाव सुनसगाव ता. जि. जळगाव) असं मृत तरूणाचं नाव आहे. दरम्यान लखन याच्या वडिलांनी दोन वर्षापूर्वी रेल्वेखालीच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
सुनसगाव येथे लखन सोनवणे हा दोन भाऊ व आईसह वास्तव्याला आहे. या परिसरातीलच एका खासगी कंपनीत तो नोकरीला होता. मंगळवारी सायंकाळी बाहेर जाऊन येतो असे सांगून लखन घराबाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटच्या पुढे रेल्वे खंबा क्रमांक ४३३/२१ येथे पवन एक्स्प्रेस समोर झोकून देत आत्महत्या केली आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल मोरे व सहाय्यक फौजदार रविंद्र तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खिशातील कागदपत्राच्या आधारे लखनची ओळख पटली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना पाठवण्यात आला. लखनच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.
दरम्यान, याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत लखन सोनवणे याच्या पश्चात आई रंजनाबाई, संजय व लहू हे दोन भाऊ असा परिवार आहे.