TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पवना धरणात आज (दि.१३) सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४९.४८ टक्के इतका पाणीसाठा झाला
![49.48 per cent water was stored in Pavana Dam till 7 pm today (13th).](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/49.48-per-cent-water-was-stored-in-Pavana-Dam-till-7-pm-today-13th..jpeg)
पिंपरी | मावळ आणि परिसरात गेल्या ८ ते १० दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे पवना धरणात आठवडाभरात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धरणात आज (दि.१३) सायंकाळी ७ वाजेपर्यंत ४९.४८ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी धरणात ३३.६० टक्के इतका पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण परिसरात जोरात पाऊस सुरू असल्याने पिंपरी चिंचवड शहरवांसीयांसह मावळसाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने संपूर्ण जून महिना दांडी मारली होती. पाऊस लांबल्याने चिंता वाढली होती. परंतू ४ जुलैला पवना धरणातील पाणीसाठा १६.२६ टक्क्यावर पोहचला होता. त्यानंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. संततधार कायम आहे.
धरणात पुरेसा पाणीसाठा होऊ लागल्याने पाणीटंचाईचे संकटही आता टळले आहे. ही बाब पिंपरी चिंचवड शहरांतील नागरिक तसेच, मावळ परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास जुलै महिना अखेरपर्यंत पवना धरण १०० टक्के भरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.