निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या 12 आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव
![12 BJP MLAs run in Supreme Court against suspension](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/निलंबनाच्या-कारवाईविरोधात-भाजपच्या-12-आमदारांची-सर्वोच्च-न्यायालयात-धाव.jpg)
मुंबई: नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदारांनी सभागृहात मोठा गोंधळ घातला. त्यांनी वेल मध्ये येत घोषणाबाजी केली. तसेच, हंगामी तालिका अध्यक्षांचा माईक हिसकावून घेतला. या गोंधळानंतर विधानसभा तहकूब करण्यात आली.
दरम्यान, यानंतर हा गोंधळ इथेच थांबला नाही, तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजप आमदारांवर करण्यात आला आणि कामकाज सुरु झाल्यावर भाजपच्या १२ आमदारांवर १ वर्षाच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यातच आता या कारवाईचा निषेध भाजपने केला असून, यानंतर तातडीने त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत असून, या निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या १२ आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात ४ याचिका दाखल केल्या असून, “आमचं निलंबन चुकीच्या पद्धतीनं आणि बेकायदेशीररित्या करण्यात आलं आहे आणि त्याच्याविरोधातच सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे