“…ही आपली संस्कृती नाही”; संजय राऊतांचा घणाघात
![Sanjay Raut speaks out about congress president rumours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Gopichand-Padalkar-wrote-letter-to-Sanjay-Raut.jpg)
“सत्ताधाऱ्यांनी देशाचा इतिहास पाहिला पाहिजे. विरोधी पक्ष आज दुबळा वाटत असला तरी अचानाक फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतो आणि ताकद दाखवतो”, असे वक्तव्य केले आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
राऊत म्हणाले, “काँग्रेस हा सर्वात जुना राजकीय पक्ष आहे. गावागावत पोहोचलेला पक्ष आहे. स्वातंत्र्य चळवळीत पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे. पंडित नेहरु, इंदिरा गांधी आणि इतरांनीही देशासाठी खूप मोठा त्याग केला आहे. त्या पक्षाचं अध्यक्षपद हे देशातील आणि राजकारणातील एक महत्वाचं पद आहे. अशा काँग्रेसच्या नियोजित अध्यक्षाला ते विरोधी पक्षाचे नेते आहेत म्हणून अपशब्द वापरुन बोलणं आपली संस्कृती नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच्या नावाने पक्ष चालतो. प्रत्येक पक्षाचा एक चेहरा असतो. तो चेहरा म्हणजे घराणेशाही नाही. कुटुंबानेही पक्ष उभा करण्यासाठी खूप त्याग केलेला असतो. यामध्ये गांधी कुटुंबही आहे. जर लोकांना गांधी कुटुंबच नेतृत्व करु शकतं असं वाटत असेल तर तो पक्षाचा निर्णय आहे. त्यात आम्ही बोलण्याची गरज नाही”.