संस्थाचालकाचे अपहरण करून बेदम मारहाण, 28 जणांविरोधात गुन्हा दाखल
![Illegal possession of the house; Crime filed against 24 including former corporator](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/crime-logo-807_202008478507.jpg)
जळगाव येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या संस्थेच्या संचालकाचे राजीनामा द्यावा, या मागणीसाठी अपहरण केले. त्यानंतर पुण्यातील सदाशिव पेठेत डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जानेवारी 2018 जानेवारी 2019 या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी विजय पाटील (वय 52) यांनी पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तानाजी भोईटे, वीरेंद्र भोईटे आणि निलेश भोईटे यांच्यासह 28 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार ते वडगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक आहेत. आरोपींनी त्यांना कागदपत्र देण्याच्या बहाण्याने पुण्यामध्ये बोलावले. पुण्यात आल्यानंतर त्यांचे अपहरण केले आणि सदाशिव पेठेतील एका फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवले.
तसेच त्यांच्या गळ्याला आणि पोटाला चाकू लावून राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला. आरोपींनी विजय पाटील यांच्यासह आलेल्या लोकांनाही डांबून ठेवले होते.
संस्थेच्या इतर संचालकाचे राजीनामे घेऊन यावेत, अशी मागणी करत त्यांना वेळोवेळी बेदम मारहाणही करण्यात आली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये खंडणी घेण्यात आली.
कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.