संविधान अन् कायद्याचा आदर राखून संयम बाळगा : शरद पवार
उद्या (शुक्रवार) ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार
राज्याभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट
पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार उद्या (शुक्रवार) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात संबंधित अधिका-यांशी सक्षम भेटून चर्चा करणार आहेत. मात्र, याठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिका-यांनी गर्दी करु नये. संविधान अन् कायद्याचा आदर राखून संयम बाळगावा, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले आहे.
पवार यांनी आपल्या फेसबूक अकाउंटवर कार्यर्क्त्यांना आवाहन केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, काल पत्रकार परिषदेत ठरल्याप्रमाणे मी उद्या शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये तेथील अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे.
सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे त्या परिसरातील वाहतुकीला व सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणातात…लढेंगे और जितेंगे भी!
राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आणि शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत अशी ओळख असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर ‘ईडी’च्या कार्यालयात उद्या आपला विठ्ठल हजार होणार आहे…मी येतोय तुम्ही येताय ना! अशी भावनिक साद घातली आहे. तसेच, ‘‘महाराष्ट्राचा इतिहास हा लढणाऱ्यांचा आहे पळणाऱ्यांचा नाही. त्यांचा प्रत्येक वार झेलायची आणि त्याला परतवून लावायची धमक आजही पवार साहेबांमध्ये आहे.’’ असा आक्रमक पवित्रा घेत ‘# लढेंगे और जितेंगे’ असा निर्धारही केला आहे.