विभाग प्रमुखांच्या गैरहजेरीत पालिका कर्मचा-यांकडून कार्यालयीन कर्तव्यात कुचराई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/0d5a99f9f3f6ee937c8eef7a01e34c3c.jpg)
आयुक्तांचा आदेशाचा भंग, खुर्ची सोडून इतरत्र पलायन
पिंपरी – महापालिकेतील सिटी ट्रान्सफॅार्मेशन आॅफीस प्रकल्पांंतर्गत आयुक्तांसह विभाग प्रमुख अधिका-याची स्ट्रॅटेजी क्लेरिफिकेशन मिटींग मुळशीतील गरुड माची याठिकाणी आयोजित केल्याने महापालिकेत दोन दिवस शुकशुकाट दिसून आला. तसेच विभाग प्रमुखाच्या गैरहजेरीत अन्य अधिकारी व कर्मचा-यांची कार्यालयातून खुर्ची सोडून इतरत्र फिरत असल्याने पालिकेत विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले होते.
शहरातील नागरिकांना शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये विविध कामासाठी सतत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे सरकारी काम अन् सहा महिने थांब अशी अवस्था नागरिकांची असते. मात्र, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयीन कर्तव्याचे पालन करण्याच्या सुचना आदेशाद्वारे केल्या होत्या. तसेच नागरिकांच्या कामांना विलंब लावल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता.
दरम्यान, महापालिकेचे सुमारे 40 ते 45 अधिकारी आज (शुक्रवारी) दुपारी दोनच्या सुमारास मुळशीकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे महापालिकेत दुपारपासूनच शुकशुकाट पसरला होता. महापालिकेतील विभागप्रमुख गायब झाल्याने अन्य अधिकारी व कर्मचा-यांचा टाईमपास सुरु होता. विविध कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले होते. याबाबत महापालिका अधिकारी, कर्मचा-याना नेमून दिलेली किंवा त्यांच्याशी संबंधित कार्यालयीन कामे करण्यास कुचराई करत होते.