मुंबई लोकल ट्रेनबाबत राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी सुरू होणार
![State government big announcement on Mumbai Local train](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Mumbai-Local.jpg)
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून मुंबईतील लोकल ट्रेन सेवा बंद आहे. आता राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवारपर्यंत घेण्यात येईल,असे उच्च न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात होऊ शकतो.
कोरोना व्हायरसमुळे इतर सेवा सुरू झाल्या असल्या तरी अद्याप मुंबई लोकल ट्रेन सुरू झालेल्या नाहीत. महिला व इतर कर्मचारी वर्गांसाठी ट्रेन सुरू झाल्या होत्या, मात्र पूर्ण क्षमतेने सर्वांसाठी सेवा अद्याप सुरू झालेली नाही. उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली असल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे. आता सर्व व्यवहार पूर्ववत होत असून लोकल रेल्वेसेवा सर्वासाठी केव्हा सुरू करणार, अशी विचारणा न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला केली असता, मंगळवापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी स्पष्ट केले.