महामेट्रोतर्फे स्वारगेट ते कात्रज मार्गाचे ड्रोन व्दारे सर्वेक्षण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/मेट्रो.jpg)
पिंपरी : महामेट्रो आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून भविष्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा विस्तार स्वारगेट पासून पुढे कात्रज पर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या या मार्गाचा तपशिलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) करण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी शनिवारी महामेट्रो तर्फे स्वारगेट ते कात्रज या मार्गावर ड्रोन कॅमेरा द्वारे रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पाहणीतून जे निष्कर्ष काढण्यात येतील त्यानुसार या मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डिपीआर) आखण्यात येणार आहे.
स्काइलार्क ड्रोन प्रा.लि. कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अंकुर वत्सल यांनी या सर्वेक्षणाविषयी माहिती देताना सांगितले की, स्वारगेट ते कात्रज या मार्गावर एकुण ७ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले आहे. ड्रोनद्वारे हे सर्व सर्वेक्षण पुर्ण करण्यात आले. सुमारे ७० मीटर उंचीवर हे ड्रोन मशिन उडवून त्याद्वारे छायाचित्रे काढून माहिती साठवली गेली आहे. या सर्वेक्षणाद्वारे १२० मीटर रूंदीच्या रस्त्याची पाहणी करून त्या रस्त्याची माहिती गोळा करण्यात आलेली आहे. घेण्यात आलेली छायचित्रे आणि व्हिडियो हे कंपनीच्या सॅाफ़्टवेअर मध्ये साठवून त्याद्वारा अंतिम अहवाल सादर करणात येणार आहे.
या संपुर्ण सर्वेक्षणाद्वारे रस्त्यावर असणारे खड्डे, रुंदी, तसेच इतर माहिती जमा करण्यात आली आहे. त्यानुसार प्रस्तावित मार्गावर मेट्रोचे खांब, सेगमेंट , पुल कुठे होणार याची माहिती डीपीआर तयार करताना त्यात वापरली जाणार आहे. या या संपुर्ण मार्गाचे सर्वेक्षण विविध ठिकाणी मिळून एकुण ६ वेळा ड्रोन परिक्षण करून पुर्ण करण्यात आले आहे. एका वेळच्या ड्रोन परिक्षणासाठी किमान १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागला.