महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना पदोन्नती ; त्यांनी पालिकेला लावली आर्थिक शिस्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/273adb9a5e31cdd5404c8a16c1a1991b.jpg)
पिंपरी – महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना राज्य शासनाने पदोन्नती देवून मुंबईत बदली करण्यात आली. मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा) सहसंचालकपदी त्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यांच्या जागी जितेंद्र विश्वनाथ कोळंबे यांची वर्णी लागली आहे. याबाबत वित्त विभागाच्या अवर सचिव माधवी गांधी यांनी शुक्रवारी बदलीचा आदेश दिला आहे.
नाशिक महापालिकेतून 1 जुलै 2016 रोजी राजेश लांडे यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत मुख्य लेखापाल पदी बदली करण्यात आली. सुरुवातीला महापालिका कर्मचारी महासंघाने त्यांना विरोध दर्शविला होता. परंतू, काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला. त्यामुळे राजेश लांडे यांना महापालिकेत तब्बल दोन वर्ष काम करण्याची संधी मिळाली.
लांडे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला आर्थिक शिस्त लावण्यात मोठा हातभार लावला आहे. त्यांच्या कार्यकाळात प्रत्येक ठेकेदारांना त्यांच्या कामावर 5 टक्के अतिरिक्त रक्कम देण्याचे बंद केले. ठेकेदारांची 31 मार्चनंतर बीले स्विकारण्यात येवू नये, याबाबत त्यांनी चुकीची प्रथा बंद केली. महापालिकेच्या ठेवी बॅंकामधून तात्पुरत्या स्वरुपात ठेवून महापालिकेला सुमारे 50 कोटीहून अधिक रक्कम मिळवून दिली. या निर्णयामुळे महापालिकेच्या स्थायी सभागृहात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महापालिकेतील ठेकेदारांनी विविध कामाची बिले स्वताः न आणता ती बिले त्या-त्या विभागाकडे दाखल करुन आणावीत, तसेच महापालिकेतील प्रथा, परंपरेनूसार दिला जाणारा बोनस न घेता, त्या बिलावर स्वताः सही करण्यास त्यांनी आयुक्तांना नकार दिला होता. लेखा विभागात ठेकेदारांना येण्यास त्यांनी मनाई केली होती. त्यामुळे महापालिकेला आर्थिक शिस्त लागून चुकींच्या कामांना चाप बसला होता. याशिवाय लांडे यांनी महापालिकेतील विविध चुकीच्या कामांना लगाम लावला होता. त्यांच्या आर्थिक शिस्तीमुळे विविध विकास कामांमधील होणा-या ‘रिंग’ला त्यांनी वेळीच रोखले होते. त्यांनी अनेक कामांवर आक्षेप नोंदविल्याने कित्येक अधिका-यांनी त्यांना छुपा विरोध दर्शविला. त्यांचा विरोधाला न जुमानता लांडे यांनी दोन वर्षे पारदर्शक कामास प्राधान्य दिले होते.
मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना राज्य शासनाने पदोन्नती दिली आहे. त्यांची मुंबईतील प्राथमिक शिक्षण परिषदेच्या (वित्त व लेखा) सहसंचालकपदी त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी पिंपरी पालिकेत जितेंद्र विश्वनाथ कोळंबे यांची वर्णी लागली आहे.