महापालिका अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी गोड; बोनस व सानुग्रह अनुदान मिळणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/pcmc.jpg)
महापालिका कर्मचारी महासंघ आणि आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. महापालिका कर्मचारी महासंघ व आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेवून तसा आदेश लेखा विभागाला आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी केला. यामध्ये 8.33 टक्के बोनस आणि 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. बालवाडी शिक्षकांना लाभ होणार आहे. या बैठकीला मुख्य लेखापाल जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, चारुशिला जोशी, मनोज माछरे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, माध्यमिक व बालवाडी शिक्षक दीड हजार आहेत. त्या सर्व वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी व कर्मचा-यासह मानधनावरील सर्वांना बोनस दिला जाणार आहे. औद्योगिक कायद्यानुसार महासंघ व महापालिकेत 8.33 टक्के बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत 2015-16 मध्ये पाच वर्षांचा करार झाला आहे. हा करार कामगार कायद्यानुसार झाला आहे. त्यानुसार महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना 8.33 प्रथा बोनस व 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येतो. बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. असेही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, महापालिका घंटागाडी कर्मचा-यांना यंदा दिवाळीसाठी 20 हजार रुपये बक्षीस रक्कम दिली जाणार आहे. गतवर्षी 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. या रकमेत यंदा वाढ करण्याचा स्थायी समितीने निर्णय घेतला आहे.