भाजपसाठी मोठा धक्का, 6 वेळा खासदार राहिलेल्या माजी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा
![6 times MP resign from BJP party post](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/bjp-party1-1.jpg)
गुजरातमध्ये भाजपसाठी मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार मनसुख वसावा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून वसावा हे पक्षातील नेत्यांवर नाराज होते.
वसावा यांनी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. माझ्या चुकीमुळे पक्षाला फटका बसत आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे वासवा यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आदिवासींशी संबंधित असलेल्या काही मुद्द्यांवरुन पक्षासोबत असलेल्या मतभेदांमुळे आपण भाजपमध्ये राहू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वसावा हे भरूच लोकसभा मतदारसंघातून सहावेळा निवडून आलेले आहेत. नर्मदा जिल्ह्यातील 121 गावांना पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर याबाबत वसावा यांनी नाराजी व्यक्त करत, हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती.