प्राध्यापक भरतीचा तातडीने निर्णय घा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/proffessor-1.jpg)
- बेममुदत उपोषणाचा उमेदवार आणि नवप्राध्यापक भरती शिष्टमंडळाचा इशारा
पुणे – प्राध्यापक भरतीबाबत राज्य शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या 9 ऑगस्ट रोजी अर्थात क्रांतीदिनापासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा नेट-सेट, पीएचडीधारक उमेदवार आणि नवप्राध्यापक भरती शिष्टमंडळाने दिला आहे. उमेदवारांच्या मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने उच्चशिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांना दिले. प्राध्यापक भरतीबाबत आता शासनाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात येणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
सहायक प्राध्यापक पद भरतीवरील बंदी उठवावी, रिक्त जागा पूर्णकालीन तत्त्वावर भरण्यात याव्यात, आकृतीबंधाच्या नावाखाली प्राध्यापक भरती लांबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तासिका तत्वावर सहायक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरावा, अशा विविध मागण्यांसाठी या संघटनेने जूनमध्ये उच्चशिक्षण संचालनालयासमोर उपोषण केले होते. यावेळी डॉ. माने यांनी उमेदवारांच्या मागण्या राज्य सरकारला कळवून त्याबाबत लवकर निर्णय घेण्याबाबात चर्चा करू, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे उमेदवारांनी उपोषण स्थगित केले होते. मात्र, आश्वासनाला दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेल्यानंतरही प्राध्यापक भरतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने डॉ. माने यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा मागण्यांचे निवेदन देऊन आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
एकूण जागांपैकी 40 टक्के जागा रिक्त
राज्यातील 1171 कॉलेजांमध्ये प्राध्यापकांची 34 हजार 531 पदे मंजूर आहे. यापैकी 25 हजार 20 पदे भरण्यात आली आहेत. तर, 9 हजार 511 प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. ही आकडेवारी 1 ऑक्टोबर 2017 च्या आकृतीबंधानुसार आहे. राज्यातील एकूण प्राध्यापकांपैकी 40 टक्के जागा रिक्त आहेत. अशातच नेट, सेट, पीएचडीधारक उमेदवारांची संख्या 50 हजारांच्यावर आहे. प्राध्यापक भरती होत नसल्याने हे सर्व उमेदवारांना नोकरीची संधी नाही. या सर्वांचा विचार करून राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत त्वरित निर्णय घ्यावा. अन्यथा येत्या 9 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाचे डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी सांगितले.