कोरेगाव भीमा विकास आराखड्याबद्दल अजित पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…
![Ajit Pawar pays tribute to Koragaon Bhima war memorial big announcement](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Ajit-Pawar-pays-tribute-to-Koragaon-Bhima-war-memorial-big-announcement.jpg)
कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी अभिवादन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. या स्तंभाच्या जवळच्या जागा ताब्यात घेण्यासाठी मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. या जागा खाजगी मालकीच्या आहेत. त्या जागा मालकांना योग्य तो मोबदला दिला जाईल आणि या जागा ताब्यात घेतल्या जातील. तसेच मी पालकमंत्री आहे आणि अर्थमंत्री देखील आहे. या विकास आरखड्यासाठी आर्थिक बाजू देखील योग्य प्रकारे सांभाळली जाईल. त्यामध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही याची ग्वाही देतो, असही अजित पवार म्हणाले.
Read: पिंपरी – चिंचवडमध्ये शाळांची घंटा वाजणार; आयुक्तांनी दिले आदेश
यावेळी केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, केंद्र सरकारने जो निधी कबूल केला होता तो अजुनही आलेला नाही. मात्र आता हे एकमेकांवर ढकलण्याऐवजी कोरोनाच्या नवीन विषाणूच्या संकटाला सामोरं जायला पाहिजे.
नववर्षानिमित्त शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले की, नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे, भरभराटीचे जावो हीच सदिच्छा. मागील एक वर्षात महाविकास आघाडीने संकटातून मार्ग काढला आहे. नवीन वर्षाचा संकल्प हाच आहे की कोरोना काळात जे नऊ महिने वाया गेले ते भरुन काढायचे आहेत.