आता शिकवणीचालकांनाही बालभारतीला रॉयल्टी द्यावी लागणार
![Demand for books from Balbharati by the municipality under Sarva Shiksha Abhiyan ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/Balbharti.png)
बालभारतीकडून परवाना शुल्कात घट: 15 लाखापर्यंत उलाढाल असणाऱ्यांना सूट
पुणे – बालभारतीच्या पुस्तकांचे स्वामित्त्व हक्क घेण्याचा निर्णय बालभारतीने घेतल्यानंतर बालभारतीने गाईड्स प्रकाशकांकडून परवाना शुल्क घेण्यास सुरुवात केली. मात्र हा निर्णय झाल्यानंतर काहीच दिवसांत बालभारतीने परवाना शुल्कात घट केली आहे. परंतु खासगी शिकवण्यांच्या साहित्य निर्मितीसाठी मात्र आता परवाना शुल्क लावले आहे.
बालभारतीने ठरविलेल्या धोरणानुसार प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी 63 हजार रुपये शुल्क, डिजिटल साहित्यासाठी दरवर्षी 35 हजार रुपये आणि प्रश्नावलीसाठी दरवर्षी 31 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते. मात्र बालभारतीच्या या धोरणाला प्रकाशकांकडून कडाडून विरोध करण्यात आला. हा निर्णय मोठ्या प्रकाशकांच्या हितासाठी असल्याची टीका झाल्यानंतर बालभारतीने हे शुल्क आता कमी केले आहे. या नव्या धोरणानुसार सरसकट प्रकाशकांच्या बालभारतीच्या पुस्तकांवरील आधारित वार्षिक उलाढालीनुसार परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक माध्यमानुसारही शुल्काचे दर बदलण्यात आले आहेत. वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना परवाने घेण्यातून सूट देण्यात आली होती ती मर्यादा आता 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामध्ये पंधरा लाखांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या छापील साहित्य प्रकाशकांना 4 हजार रुपयांपासून ते 63 हजार रुपयांपर्यंत परवाना शुल्क द्यावे लागणार आहे. तर इ साहित्य निर्मिती करणाऱ्यांनाही 2 हजार ते 31 हजारांपर्यंत परवाना शुल्क द्यावे लागणार आहे.
या नव्या धोरणानुसार आता खासगी शिकवण्यांकडून देण्यात येणाऱ्या प्रश्नावली (वर्कबुक) आणि साहित्यासाठीही शिकवणीचालकांना शुल्क भरावे लागेल. वार्षिक उलाढाल 15 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना, शिकवण्यांना किंवा इ साहित्य निर्मात्यांना शुल्क भरावे लागणार नाही. यंदा पहिली, आठवी आणि दहावीच्या पुस्तकांसाठी परवाने घ्यावे लागतील. पुढील वर्षी (2018-19) पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांवर आधारित साहित्य निर्मितीसाठी परवाने घ्यावे लागतील.
शिकवण्यांसाठीचे परवाना शुल्क
उलाढाल मराठी, इंग्रजी माध्यम इतर माध्यमे
15 लाख ते 2 कोटी रुपये 4,380 2,190
2 ते 5 कोटी रुपये 8,750 4,380
5 ते 10 कोटी रुपये 17,500 8,750
10 कोटी रुपयांपेक्षा आधिक 35,000 17,500