आजच्या पिढीने मराठी साहित्याचे वाचन करावे – खासदार श्रीनिवास पाटील
‘माय माझी इंद्रायणी’ आणि ‘वेध सामाजिक जाणिवाचा’ या अरुण बो-हाडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
पिंपरी । प्रतिनिधी
परदेशी फ्लेमिंगो पहायला गर्दी करणा-या आजच्या पिढीला चिमण्या, कावळ्यांची आणि येथील काळ्या मातीची महती कळली पाहिजे. यासाठी आजच्या पिढीने मराठी साहित्याचे वाचन करायला पाहिजे. आधुनिकते बरोबरच संस्कृतीतही बदल होत गेला. पाश्चात्यांप्रमाणे तोकडे कपडे घालून पांडूरंगाचा गजर करणारी युवा पिढी आपण पहात आहोत. संस्कृती कपड्याने बदलत नाही तर मनी भाव असला पाहिजे. कपड्यांपेक्षा, भाषेपेक्षा भाव महत्वाचा आहे, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
मोशी येथे अरुण बो-हाडे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अध्यक्ष स्थानावरुन खा. पाटील बोलत होते.
व्यासपीठावर आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी शहर कॉंग्रेस अध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, महंमद पानसरे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, अरुण बो-हाडे तसेच गीतांजली बो-हाडे, हिरामण सस्ते, ज्ञानेश्वर सस्ते, प्रकाशक संदिप तापकीर आणि योगेश काळजे, हभप तुकाराम भालेकर, श्रीहरी तापकीर, श्रीधर वाल्हेकर, कामगार नेते दिलीप पवार, आतिश बारणे, सुहास पोफळे, विजय भिसे आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, आजची संस्कृती, राजकारण जातीबध्द झाले आहे. पण भारतीय संविधानाला जात धर्म नाही. भारतात राजकारण करणारे भरपूर आहेत. पण यशवंतराव चव्हाणसारखे सुसंस्कृत कमी आहेत. यशवंतराव चव्हाण हे अस्सल माणूसपण जपणारे होते. त्यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले शरद पवार, श्रीनिवास पाटील हे माणूसकीचं राजकारण करणारे नेते आहेत. नेता ही संकल्पना बदनामीच्या चक्रात अडकली आहे. राजकीय नेतृत्वाने आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे. लोकशाहीचे चाललेले विडंबन समाधानकारक नाही.
प्रास्ताविक करताना अरुण बो-हाडे म्हणाले की, या पुस्तकात सामाजिक जडणघडण, सामाजिक मनोभाव आणि सामाजिक स्पंदने आणि जाणिवा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
कार्यक्रमाच्या संयोजनात राम सासवडे, दामोदर वहिले, सनिल सत्ते, गणेश सत्ते, ज्ञानेश्वर वायकर, विजय पिरंगुटे आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक अरुण बो-हाडे, सुत्रसंचालन संतोष घुले आणि आभार हिरामण सस्ते यांनी मानले.