breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू राष्ट्राला समर्पित करण्यात आला. यावरून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची शंका वाटते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, २२ जानेवारीला काळाराम मंदिरात येण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देणार आहोत, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, २२ जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहोत. गोदाकाठी महाआरतीही करणार आहोत. २२ तारखेला अयोध्येत जे राम मंदिराचे लोकार्पण होणार आहे. ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामाची नाही तर आपल्या राष्ट्राचीच ती प्राणप्रतिष्ठा आहे अशी आमची भावना आहे. अनेकांना माहिती नसेल परंतु राम मंदिराप्रमाणे सोमनाथ मंदिराचाही विध्वंस अनेकदा केला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी पुढाकार घेत ते मंदिर पुन्हा उभारले. पण प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेला वल्लभभाई नव्हते, त्यांचे निधन झाले होते. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सोमनाथ मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली होती.

हेही वाचा   –    नाशिकच्या काळा राम मंदिरातील स्वच्छता मोहिमेवरून संजय राऊतांची मोदींवर टीका; म्हणाले..

अयोध्येबाबतही वर्षोनुवर्ष जो लढा सुरू होता त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला त्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेला राष्ट्रपतींना आमंत्रित करायला हवं होते. मात्र त्यांनी ते केले नाही. परंतु आम्ही नाशिकला काळा राम मंदिरात जाणार आहोत. त्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण देत आहोत. आम्ही कुठलेही राजकारण न आणता नाशिकच्या कार्यक्रमासाठी आम्ही राष्ट्रपतींना जाहीर आमंत्रण देत आहोत. त्यासोबत रितसर खासदारांचे शिष्टमंडळ भेटून राष्ट्रपती मुर्मू यांना निमंत्रण देत आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिरात रामाची मूर्ती असेल की नाही याची शंका वाटते. अटल सेतूचे उद्घाटन केले परंतु अटलबिहारींचा फोटोच लावला नाही. प्रभू रामचंद्र दशरथ राजाचे पुत्र होते. राम वनवासात जाताना सहकुटुंब वनवासात गेले. सीताहरण झाल्यानंतर रामायण घडलं. गद्दारांची घराणेशाही यावर पंतप्रधान मोदी बोलले नाही. ती घराणेशाही त्यांना प्रिय आहे. परंतु घराणेशाहीबद्दल घरंदाज लोकांनी बोलायला हवं, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button